Homeक्राइमRaigad News : रोहेकरांच्या संतापाचा उद्रेक, म्हणाले नराधमाला खुलेआम फाशी द्या!

Raigad News : रोहेकरांच्या संतापाचा उद्रेक, म्हणाले नराधमाला खुलेआम फाशी द्या!

Subscribe

पनवेल : रोहा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी आरोपी तेजस पडवळ (30) याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या भावांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला खुलेआम भर चौकात फाशी देण्याची मागणी संतप्त रोहेकरांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि नराधमाला फाशी देण्याच्या मागणीसाठी शेकडो रोहेकरांनी शुक्रवारी संध्याकाळी मूक मोर्चा काढला होता.

पीडित मुलीच्या कुटुंबाला धीर आणि पाठिंबा देण्यासाठी रोहेकरांनी त्यातही महिलांनी शुक्रवारी सायंकाळी जोरदार मूक मोर्चा काढून संतापाला वाचा फोडली. आजमितीला राज्यात महिला, युवती तसेच अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत. या विकृत मनोवृतीला पोलीस प्रशासनाने जागीच ठेचून काढले पाहिजे, असे म्हणत रोह्यातील नराधमाला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी संतप्त महिलांनी केली. या निमित्ताने वरसे नाक्यापासून दमखाडी नाका, रोहा शहर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी नराधमाला कठोर शिक्षा देण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

नक्की काय घडले?

ही घटना 30 डिसेंबरची आहे आणि गुन्हा 7 जानेवारी रोजी दाखल झाला. घरासमोर सायकल चालवत असताना आरोपी तेजसने अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. शिवाय कुणाला सांगितले तर तू आणि तुझे आई मराल, अशी धमकी दिली. त्यानंतर मुलीने हा प्रकार काकी आणि वडिलांना सांगितला. याबाबत आरोपीला जाब विचारला असता आरोपीने फिर्यादी आणि तिचा नवरा, दीर, जाऊ यांना मारहाण करून शिवीगाळ केली. शिवाय आरोपीच्या भावांनी तक्रारीसाठी जाणाऱ्या फिर्यादींना पोलीस ठाण्यात जाताना अडवले.

पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे बुधवारी (8 जानेवारी) रोह्यात पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय शांत झाले.

लोकप्रतिनिधींच्या भावना

या दुर्घटनेनंतर महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे तसेच रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. तर नराधमाला अद्दल घडवणार असे म्हणत गोगावले यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याचे सांगितले.

(Edited by Avinash Chandane)