अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होती. याच किल्ल्यावरून कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड जिल्हा असे करण्यात आले. मात्र, शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम रायगडमधील नराधम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने रोहा तालुक्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वर्षभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यात 2024 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या 107 घटना घडल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे यातील 74 प्रकरणे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. या घटनांमुळे रायगड बदनाम होत असून अशा नराधमांना शिवकालीन शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा… SN Subrahmanyan : “बायकोचे तोंड कितीवेळ बघणार? रविवारीही काम करा…”, L&T च्या ‘CEO’ची मुक्ताफळे
महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत. तरीही 2019-20 पर्यंत रायगड जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे दरवर्षी सरासरी 50 गुन्हे दाखल होत होते. यात तीन वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. या नराधमांवर पास्को अंतर्गत गुन्हे दाखल होत असले तरी गुन्हे वाढले आहेत आणि नराधमांची हिंमत वाढली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. आता तर दरवर्षी सरासरी लैंगिक अत्याचाराचे 100 गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. रायगड जिल्ह्यासाठी ही बाब मान खाली घालणारी आहे. महिला अत्याचारासाठी ‘शक्ती’ हा अत्यंत कडक कायदा येणार, अशी अनेक वर्षे चर्चा होत आहे. प्रत्यक्षात हा कायदा कधी येणार याची कुणालाच काही माहिती नाही.
गेल्या वर्षी (2024) जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या १०७ घटनांची नोंद झाली आहे. शिवाय 157 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्काराच्या 107 पैकी 74 गुन्हे हे पॉस्को कायद्याअंतर्गतचे आहेत. पोलीस अधीक्षकांच्या हद्दीत जिल्ह्यात 28 पोलीस ठाणे आहेत. त्यातील 24 पोलीस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. वडखळ, कर्जत, खालापूर, रसायनी, गोरेगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा आणि अलिबागसारख्या ग्रामीण भागातही अशाच स्वरूपाचे गुन्ह्यांची नोंद आहे.
पोलीस संवेदनशील
कुटुंब आणि स्वत:च्या बदनामीच्या भीतीने याआधी तक्रारीसाठी कुणी फारसे पुढे येत नव्हते. मात्र, जागरुकता वाढल्याने पीडित मुली आणि पालक तक्रारीसाठी पुढे येत आहेत. अशा गुन्ह्यांबाबत पोलीस संवेदनशील असून दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आम्ही आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केली आहेत.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
लैंगिक अत्याचाराचे प्रमाण
वर्ष गुन्हे
2019 – 49 गुन्हे
2020 – 58 गुन्हे
2021 – 57 गुन्हे
2022 – 106 गुन्हे
2023 – 100 गुन्हे
2024 – 107 गुन्हे
(Edited by Avinash Chandane)