घरक्राइमकरीमलालाच्या नातेवाईकाला नवी मुंबईतून अटक, लाखोंचे ड्रग्स जप्त 

करीमलालाच्या नातेवाईकाला नवी मुंबईतून अटक, लाखोंचे ड्रग्स जप्त 

Subscribe

परवेजकडून एनसीबीच्या अधिकार्‍यांनी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

मुंबई शहरात एकेकाळी प्रचंड दहशत असलेला करीमलाला याचा नातेवाईक आणि सध्या दाऊद इब्राहिमसाठी काम करणारा कुख्यात गुंड परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण याला नवी मुंबईतून अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली आहे. परवेजकडून एनसीबीच्या अधिकार्‍यांनी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्यांची किंमत काही लाखांमध्ये आहे. परवेजच्या अटकेनंतर दक्षिण मुंबईत बुधवारी सकाळी सुरु झालेले ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळे या कारवाईचा अधिकृत तपशील सांगण्यास एनसीबीकडून नकार देण्यात आला. परवेज हा करीमलालाचा अत्यंत जवळचा नातेवाईक समजला जातो. गेल्या काही वर्षांपासून परवेज हा दाऊद टोळीसाठी काम करत होता.

परवेज ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत सहभागी असून सध्या नवी मुंबईतून ऑपरेट करत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच एनसीबीच्या एका विशेष पथकाने नवी मुंबईतून परवेजला शिताफीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्याकडून पोलिसांनी उच्च प्रतीचे काही ड्रग्ज जप्त केले असून त्यांची किंमत काही लाखांमध्ये आहे.

- Advertisement -

परवेजच्या चौकशीतून तो नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत ड्रग्ज तस्करी करत असल्याचे उघडकीस आले. हे काम करण्यासाठी त्याने काही ड्रग्ज पेडलर्सची नियुक्ती केली असून ते त्याच्या सांगण्यावरुन ड्रग्जची विक्री करतात. या ड्रग्ज पेडलरची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या अधिकार्‍यांनी दक्षिण मुंबईतील नागपाडासह इतर ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे. परवेजविरुद्ध ड्रग्जच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असून त्याच्याविरुद्ध काही खटले प्रलंबित असल्याचे बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -