चार महिन्यापासून वेतन थकीत; रेल्वे उद्घोषकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

Salary arrears for four months attempted suicide by railway announcer

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी पद्धतीवर असलेल्या शेकडो मराठी रेल्वे उद्घोषकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली आहे. याला कंटाळून उल्हासनगरमधील व्यंकटेश वेणूगंटी या उद्घोषकाने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेवरून रेल्वेचे सर्व कंत्राटी उद्घोषकांनी कंत्रादाराविरोधात बुधवारी रात्रीपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. तसेच गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

भारतीय रेल्वेत खासगीकरणाचा सपाटा लावला असून त्याचा फटका खासगी कंत्राटदार उद्घोषकांना बसत आहे. भारतीय रेल्वेत रेल्वे स्थानकांवर उद्घोषकांसाठी पूर्वीपासून रेल्वेच्या विविध विभागांतून उद्घोषकांसाठी निवड होत होती. या पदावर बढती किंवा इतर वाढीची शक्यता नसल्यामुळे अनेक रेल्वे कर्मचारी या पदाकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे अनेक स्थानकांवर उद्घोषकांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे मध्य रेल्वेने २०१६ पासून रेल्वेने खासगी उद्घोषकांची नेमणूक करण्याची सुरुवात केली. यासाठी दोन वर्षांच्या करारावर खासगी कंपनीला कंत्राट देण्यात येत आहे. सध्या एस अ‍ॅण्ड एस ऑऊट सोर्सिंग नावाच्या कंपनीला रेल्वेमध्ये अनाऊन्सर इंडिकेटर ऑपरेटरचे कंत्राट दिले आहे. मध्य रेल्वेच्या ३५ पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर कंत्राटी उद्घोषकांची नेमणूक केली आहे. मुंबई आणि उपनगरातील शंभर पेक्षा जास्त मुले मुली या रेल्वे स्थानकावर कंत्राटी उद्घोषक म्हणून काम करतात. यामध्ये सर्वाधिक मराठी मुला मुलींचा समावेश आहे. आगोदरच तुटपुंज्या पगारात काम करणाऱ्या या कंत्राटी उद्घोषकांना कोरोना काळातील गेल्या चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यासंबंधी कंत्राटदाराची तक्रार केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप कंत्राटी उद्घोषकांनी केला आहे.

आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल

उल्हासनगर रेल्वे स्थानकातील उद्घोषक व्यंकटेश वेणूगंटीचे वेतन गेल्या चार महिन्यापासून थकीत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची झाली होती. गेल्या काही दिवसापुर्वी त्याने वेतनासंबंधीत रेल्वे प्रशासनाला आणि कंत्राटदाराला पत्र व्यवहार केला होता. मात्र त्यावर रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदारांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंटाळून त्याने बुधवारी रात्री विषप्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधीत व्हिडिआ समाज माध्यमांवरही टाकला होता. व्हिडिआ व्हायरल होताच रेल्वेच्या सर्व कंत्राटी उद्घोषकांनी बुधवारी रात्रीपासून काम बंद आंदोलन केले आहे. उद्घोषक व्यंकटेश यांच्यावर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.