सोलापूर : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील बीड आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या हत्या आणि मारहाण प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील तालुक्यामध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे समोर आले आहे. (Solapur Crime young man brutally killed after being stripped and burned with hot rods in malshiras)
हेही वाचा : Jayant Patil : ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काय खरे नाही,’ जयंत पाटलांच्या विधानाने भुवया उंचवल्या
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. यावेळी त्याला लोखंडी सळईने चटकेही देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली असून या तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत वनविभागाच्या क्षेत्रात निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी माळशिरज पोलिसांनी एका तरुणीला तसेच एका अल्पवयीन मुलाला अटक केल्याचे समोर आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पण, यामुळे पुन्हा एकदा राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील 28 वर्षीय आकाश अंकुश खुर्द-पाटील या तरुणाचा माळशिरस-पिलीव रोडवर पिलीव हद्दीमध्ये असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये विवस्त्र मृत्यूदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. यावेळी त्याच्या शरीरावरती अनेक गंभीर जखमा असून यामध्ये गरम लोखंडी सळईने चटके दिले असल्यासारख्या जखमा आहेत. त्याच्या मृतदेहाशेजारीच त्याची मोटरसायकली आढळून आली. सदर घटनेची माहिती मिळताच पिलीव औट पोस्टचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. अजून शवविच्छेदनाचा अहवाल आला नसून यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. आकाश हा त्याची आई, पत्नी आणि 7 महिन्याच्या मुलासह राहत होता. याप्रकरणी त्याच्या आईने माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना, ‘माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना शोधून फाशी द्या, त्यांचेही असेच हालहाल करून शिक्षा द्या, अशी आर्त हाक दिली. या हत्येचा पोलीस अधिक तपास करत असून त्यांनीही अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.