नवी दिल्ली : जवळपास 22 वर्षांपूर्वी एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. ही घटना त्यांच्या सात वर्षांच्या मुलीने स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली होती. या हत्या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हत्या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, साक्षीदारासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. जर एखादा मुलगा साक्ष देण्यास सक्षम असेल, तर त्याची साक्ष इतर कोणत्याही साक्षीदारा इतकीच वैध असेल. असे म्हणत न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडण्याचा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. (Supreme Court upholds minor girl testimony sentences husband to life imprisonment in murder case)
मध्य प्रदेशातील सिंहराई गावात राहणाऱ्या बलवीर सिंह या आरोपी पतीने 15 जुलै 2003 रोजी त्याची पत्नी बिरेंद्र कुमारीची हत्या केली होती. बलवीर सिंहने गळा दाबून पत्नीची हत्या केली होती. तसेच मध्यरात्री त्याने त्याच्या बहिणीच्या मदतीने आपल्या मृत पत्नीवर अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही बलवीर सिंह याच्यावर होता. अंत्यसंस्काराची माहिती मृत महिलेचे नातेवाईक भुरा सिंग यांना समजली. त्यानंतर त्यांनी या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. या घटनेची सर्वात मोठी साक्षीदार मृत महिलेची मुलगी राणी होती. तिने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात घटनेची माहिती दिली. मात्र न्यायालयाने मुलगी अल्पवयीन असल्याने तिचे म्हणणे फेटाळले आणि आरोपी बलवीर सिंह याची निर्दाेष मुक्तता केली होती. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पीडित कुटुंबाने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हेही वाचा – Mulund Crime : संसार मोडल्याच्या रागात संतप्त जावयानं सासूला पेटवलं; मुलुंडमधील घटना उघडकीस
सर्वाेच्च न्यायालयाने हत्या प्रकरणात निकाल देताना म्हटले की, असा कोणताही नियम नाही की मुलाच्या विधानावर अवलंबून राहण्यापूर्वी त्याची पुष्टी करावी. त्यांच्यावर विश्वास ठेवणे ही केवळ सावधगिरी आणि विवेकाची बाब आहे. खटल्यातील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीत आवश्यक असल्यास न्यायालय अशा साक्षीदारांचा वापर करू शकते. परंतु एखाद्या केसमध्ये साक्षीदार म्हणून मुलांना धोकादायक मानले जाते. कारण ते सहजपणे एखाद्याच्या शिकवणीला बळी पडू शकतात. परंतु न्यायालयाने अशा शक्यता नाकारल्या पाहिजेत. जर न्यायालयाला चौकशीनंतर असे आढळून आले की मुलाला शिकवले गेले नाही किंवा सरकारी पक्षाने मुलाला साक्षीदार म्हणून वापरण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, तर न्यायालय निकाल देताना मुलाच्या साक्षीवर अवलंबून राहू शकते, अशी भूमिका न्यायालयाने मांडली.
हेही वाचा – Kerala Murder : हातोडी घेत सहा जणांची डोकी फोडली आणि स्वतःच येऊन सांगितला थरार, नेमकं प्रकरण काय?