घरक्राइमअल्पवयीन कारचालकाने स्वच्छता कर्मचार्‍यांना चिरडले

अल्पवयीन कारचालकाने स्वच्छता कर्मचार्‍यांना चिरडले

Subscribe

डहाणू नगर परिषद कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू

डहाणू बोर्डी राज्यमार्गावर शनिवारी भीषण अपघातात दोन स्वच्छता कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. राज्यमार्गावरून बोर्डीकडून पारनाका डहाणूकडे येणार्‍या भरधाव वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने सदरचा अपघात घडला असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. वाहनचालक हा अल्पवयीन मुलगा असून तो भरधाव वेगाने कार चालवत होता.

डहाणू उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर वाहनावरील ताबा सुटून समोरील दोन स्वच्छता कर्मचार्‍यांना चिरडून कार भिंतीला जाऊन धडकल्याची माहिती मिळाली आहे. अपघातप्रकरणी डहाणू पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -

शनिवारी सकाळच्या सुमारास डहाणू नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी भरत कानजी राऊत (५५, रा. आगर, कॉटेज हॉस्पिटलजवळ) आणि वंकेश मंजी झोप (३८, रा. चिंबावे बामनपाडा) हे डहाणू-बोर्डी राज्यमार्गावर रस्त्याच्या पूर्वेकडे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वच्छतेचे काम करीत होते. दरम्यान, पाऊस आल्याने ते जवळच असलेल्या भिंतीच्या आडोशाला उभे होते. त्यावेळी बोर्डी बाजूकडून पारनाका बाजूला येणार्‍या एका भरधाव (कार क्र. एमएच ४८ एसी ८७७१) कारचालकाचा ताबा सुटून कारने त्यांना चिरडले. अपघातात दोन्ही स्वच्छता कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू झाला असून १६ वर्षीय अल्पवयीन कारचालक (रा. डहाणू, इराणी रोड) सुस्थितीत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी डहाणू पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही कर्मचार्‍यांचे मृतदेह डहाणू उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालय व पोलीस स्टेशनच्या आवारात स्वच्छता कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. डहाणू पोलिसांकडून अल्पवयीन मुलावर नेमक्या कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला याची माहिती मिळू शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -