News by अरूण सावरटकर
मुंबई : शेअरमार्केट गुंतवणुकीच्या नावाने एकोनीस जणांची सुमारे तीन कोटींची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर येत आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. किरण चव्हाण, किशोर चव्हाण, जितेश मालवणकर आणि मयुरी भोगले अशी या चौघांची नावे आहेत. या टोळीने अशाच प्रकारे इतरांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. (Three crores embezzled in the name of stock market investment)
तक्रारदार जोगेश्वरी येथे राहत असून एका ज्वेलर्स दुकानात कामाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या मित्रांनी त्याला आर्थिक गुंतवणुकीबाबत एक योजना सांगितली होती. किरण आणि जितेश हे दोघेही शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करत असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला असल्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदाराने त्या दोघांची भेट घेतली. यावेळी तिथे आरोपींचे इतर दोन सहकारी किशोर आणि मयुरी हे देखील उपस्थित होते. आरोपींनी तक्रारदाराला शेअरमार्केट गुंतवणुकीच्या विविध योजनांची माहिती सांगून गुंतवणुकीवर अल्पवधीत बारा टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तक्रारदारने आरोपींवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली.
हेही वाचा – Kalyan Crime : धावत्या लोकलमध्ये तरुणाचा प्रवाशांवर चाकूहल्ला, नेमके काय घडले?
गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्यामुळे तक्रारदाराने त्यांच्या परिचित नातेवाईक आणि मित्रांना आरोपींबाबत माहिती दिली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत तक्रारदारासह इतर अठरा जणांनी चारही आरोपींकडे तीन कोटी सात लाखांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना काही महिने चांगला परतावा मिळाला, मात्र नंतर कुठलाही परतावा न देता ते चौघेही मोबाइल बंद करून पळून गायब झाले. हा प्रकार लक्षात येताच या सर्वांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन चारही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर किरण चव्हाण, किशोर चव्हाण, जितेश मालवणकर आणि मयुरी भोगले यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून कट रचून पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात किरणचे वडील किशोर चव्हाण या संपूर्ण कटाचे मास्तरमाईंड असल्याचे पोलिसांना समजले. तसेच या टोळीने इतर 60 ते 75 लोकांना अशाच प्रकारे चांगला परतावा देतो, असे सांगून शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा – Crime : प्रेमभंग झालेल्या 22 वर्षांच्या तरुणीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल