घरक्राइमगुंतवणूकदारांना १३ कोटींचा गंडा; तीन संचालकांविरोधात गुन्हा दाखल

गुंतवणूकदारांना १३ कोटींचा गंडा; तीन संचालकांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

तक्रारदार महिलेने तीन कोटी तर त्यांच्या नातेवाईकांनी सुमारे सात कोटींची गुंतवणूक केली होती. काही महिने व्याजदर मिळाल्यानंतर त्यांनी गुंतवणुकीसह व्याजाचे पैसे देणे बंद केले होते. या सर्वांना व्याजापोटी कंपनीकडून सव्वाकोटी येणे बाकी होते. मात्र कंपनीने त्यांना पैसे परत केले नाही.

मुंबईः गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेसह तिच्या कुटुंबियांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे १३ कोटी रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी खाजगी कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

भगवानदास रामचंद्र भट्टड, हरिश रामचंद्र भट्टड आणि लक्ष्मीनारायण रामचंद्र भट्टड अशी या तिघांची नावे असून ते तिघेही भट्टड ग्रुप कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ३६ वर्षीय तक्रारदार महिला ही व्यावसायिक आहे. तिने २०१६साली लहान मुलांसाठी शिक्षण देणारी एक वेबसाईट सुरु केली आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या परिचित मित्राने तिला भट्टड ग्रुपची माहिती दिली होती. कंपनीचे तीन संचालक भगवानदास, हरिश आणि लक्ष्मीनारायण हे बिल्डर असून त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना पैशांची गरज असते. त्यामुळे त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यांच्याकडून त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे ही महिला तिच्या पतीसोबत भट्टड कंपनीच्या कार्यालयात गेली होती.

- Advertisement -

त्यावेळी या तिन्ही आरोपींनी त्यांना त्यांच्या प्रोजेक्टची माहिती देताना त्यांची गुंतवणूक रक्कम त्यांच्याकडे सुरक्षित असल्याची हमी दिली होती. त्यांच्या १९ कंपन्या असून याच कंपन्यांमध्ये ते गुंतवणुकदारांचे पैसे गुंतवून त्यांना वार्षिक बारा टक्के व्याजदर देत असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यांच्यावर विश्‍वास ठेवनू या महिलेने त्यांच्याकडे २०१४ ते २०१७ या कालावधीत गुंतवणुक केली होती. त्यांना वर्षांला व्याजासह पैसे मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा कंपनीत गुंतवणुक केली होती.

तक्रारदार महिलेने तीन कोटी तर त्यांच्या नातेवाईकांनी सुमारे सात कोटींची गुंतवणूक केली होती. काही महिने व्याजदर मिळाल्यानंतर त्यांनी गुंतवणुकीसह व्याजाचे पैसे देणे बंद केले होते. या सर्वांना व्याजापोटी कंपनीकडून सव्वाकोटी येणे बाकी होते. मात्र कंपनीने त्यांना पैसे परत केले नाही. विविध कारण सांगून कंपनीकडून गुंतवणुकदारांना थातूरमातूर उत्तरे दिली जात होती. गुंतवणुकदारांना कंपनीने दिलेले ४१ धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

अशा प्रकारे कंपनीने तक्रारदार महिलेसह तिच्या कुटुंबियांची सुमारे १३ कोटी ३१ लाख ३४ हजार रुपयांचा परस्पर अपहार करुन  फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कंपनीच्या तिन्ही संचालकाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंदविला आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -