मुंबई (अरुण सावरटकर) : कामा रुग्णालयातील तिघांना 40 हजारांची लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. प्रबंधक सुरेश पाटील, लिपीक विशाल चव्हाण आणि अमीत महागंडे अशी या तिघांची नावे असून नोंदणी प्रमाणपत्रासाठी या तिघांनी लाचेची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (Three people from Cama Hospital caught red-handed while accepting bribe)
तक्रारदार सांगलीच्या आष्ट्रा परिसरात क्ष किरण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलची नोंदणीसह प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी ते मुंबईत आले होते. अलीकडेच त्यांनी कामा रुग्णालयाच्या महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल येथे नोंदणीसह प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. अर्जानंतर त्यांनी तेथील प्रबंधक सुरेश पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्याकडे 40 हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. लाच दिल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही याची खात्री होताच, तक्रारदाराने लाच देण्याची तयारी दर्शविली.
हेही वाचा – Cyber Crime : वयोवृद्ध महिलेची कोटी रुपयांना फसवणूक, डिजीटल अरेस्टच्या नावाने घातला गंडा
तक्रारदाराने सुरेश पाटील याच्याविरुद्ध 13 जानेवारीला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. या तक्रारीची अधिकार्याकडून शहानिशा करण्यात आली. सुरेश पाटील याच्यावतीने विशाल चव्हाण याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी गुरुवारी (16 जानेवारी) संबंधित कार्यालयात सापळा लावला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार 40 हजाराची लाच घेऊन तिथे गेले. यावेळी सुरेश पाटील यांनी ही रक्कम अमीत महागंडे यांना देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने अमीतला 40 हजार रुपये दिले. ही रक्कम मिळताच तक्रारदाराने सुरेश पाटील आणि विशाल चव्हाण यांना फोन करून लाचेची रक्कम मिळाल्याचे सांगितले. याच दरम्यान अधिकार्यांनी अमितला आणि नंतर सुरेश पाटील व विशाल चव्हाण अशा तिघांनाही लाचेची मागणी करून लाच घेतल्याप्रकरणी अटक केली.
वयोवृद्ध महिलेची कोटी रुपयांना फसवणूक
मुंबई : वांद्रे येथे राहणार्या एका वयोवृद्ध महिलेची तब्बल 01 कोटी 31 लाख रुपयांना फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगाने हा गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सायबर सेल पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 82 वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथे राहत असून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयासह ट्राय कंपनीकडून दोन अज्ञात व्यक्तींनी तिची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – Saif Ali Khan Update : सैफ अली खानवर चाकू हल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात; पोलिसांकडून चौकशी सुरू