News by अरूण सावरटकर
मुंबई : वांद्रे येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या मस्त्यव्यवसाय विभागाच्या दोन अधिकार्यासह तिघांना लाचलुपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. बंदर परवाना ट्रान्स्फर करण्यासाठी पंधरा हजारांची लाचेची रक्कम घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. पुलकेश वसंत कदम, निरज अशोक चासकर आणि संजय धनाजी कोळी अशी या तिघांची नावे आहेत. (Three people including two officials of the Fisheries Department arrested for demanding bribe for port license transfer)
आरोपी पुलकेश हा मस्त्यव्यवसाय विभागात सहाय्यक आयुक्त तर निरज चासकर हा सहाय्यक मस्त्यव्यवसाय विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या दोघांच्या वतीने संजय कोळी या खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराचा मासेमारीचा व्यवसाय असून त्यांची एक फायबर बोट आहे. त्याला मुंबई बंदराचा परवाना रद्द करून अलिबाग येथे ट्रान्स्फर करून हवा होता. त्यासाठी त्याने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांत संबंधित विभागात अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नव्हती.
हेही वाचा – New India Cooperative Bank : 122 कोटींचे गैरव्यवहार प्रकरण, माजी सीईओसह दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी
दोन दिवसांपूर्वी त्यांना संजय कोळी याने फोन करून तक्रारदाराचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी पुलकेश कदम आणि निरज चासकर यांच्या वतीने पंधरा हजारांची लाचेची मागणी केली. ही लाच दिल्याशिवाय त्यांचे काम होणार नाही असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संजयने या दोन्ही अधिकार्यांच्या वतीने लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार गुरुवारी (20 फेब्रुवारी) संबंधित कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी पुलकेश यांना पाच हजार तर निरज यांना दहा हजारांची लाचेची रक्कम दिली. यावेळी तिथे संजय कोळी उपस्थित होता. याच दरम्यान या अधिकार्यांनी या तिघांनाही लाचेच्या गुन्ह्यांत रंगेहाथ अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही आज (21 फेब्रुवारी) दुपारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हेही वाचा – Verdict : कोर्ट म्हणते- अनोळखी महिलेला तुम्ही स्मार्ट आहात, गोऱ्या आहात…; असा मेसेज पाठवणे म्हणजे अश्लीलता