टिटवाळ्यात बंदूकीचा धाक दाखवून दोघांचे अपहरण, २५ लाखांच्या खंडणीची मागणी

Two abducted at gunpoint in titwala demand Rs 25 lakh ransom
बंदूकीचा धाक दाखवून ट्रान्सपोर्टरसह दोघांचे अपहरण, २५ लाखांच्या खंडणीची मागणी

टिटवाळा गणपती मंदिराजवळ रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक ट्रान्सपोर्टर व त्याच्या एका साथीदाराचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपहरणकर्त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. टिटवाळा पूर्व येथील गणपती मंदिराजवळ राहणारा लोकेश पवार आणि त्याचा मित्र राजेश कोर हे २२ डिसेंबरला दुपारी घरी जात होते, असे सांगण्यात येत आहे.

त्याचवेळी आरोपी कुणाल नानू रावते आणि त्याचे साथीदार जॅक, हॅरी आणि एक यादव नावाचा या चार जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लोकेश पवार आणि राजेश कोर यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्यांना इगतपुरी येथे नेले आणि तेथील एका फार्महाऊसमध्ये बंद केले. अपहरणकर्त्यांनी लोकेश आणि राजेश यांना दोन दिवस फार्महाऊसमध्ये डांबून ठेवले.त्यानंतर कुटुंबीयांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून २५ लाखांची खंडणी मागितली.

एवढेच नाही तर पैसे न दिल्यास कुटुंबीयांना फोन करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर लोकेश पवार यांनी टिटवाळा पोलिस ठाण्यात कुणाल नानू रावते आणि त्याचे साथीदार जॅक, हॅरी आणि यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध अपहरण, शस्त्रास्त्र कायदा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, एपीआय योगेश गुरव तपास करत आहेत.