(Verdict) मुंबई : रात्रीच्या वेळी एखाद्या अनोळखी महिलेला ‘तू सडपातळ आहेस, खूप स्मार्ट आणि गोरी आहेस, मला तू आवडतेस,’ असे मेसेज पाठवणे हे अश्लीलतेसारखेच आहे, असा निर्वाळा मुंबईतील सत्र न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. माजी नगरसेविकेला WhatsAppवर अश्लील संदेश पाठवल्याबद्दल एका व्यक्तीची शिक्षा कायम ठेवताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश (दिंडोशी) डी जी ढोबळे यांनी ही टिप्पणी केली. (Court ruling that sending a message to a stranger is obscenity)
न्यायालयाने 18 फेब्रुवारी रोजी हे आदेश दिले आहेत. एक सर्वसाधारण व्यक्ती त्या-त्या काळातील समाजातील ज्या मानकांचा वापर करतो, त्यानुसार अश्लीलतेची व्याख्या केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीने रात्री 11 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार महिलेला ‘तू सडपातळ आहेस’, ‘तू खूप स्मार्ट दिसतेस’, ‘तू गोरी आहेस’, ‘मी 40 वर्षांचा आहे’, ‘तू विवाहित आहेस का?’ आणि ‘मला तू आवडतेस’ अशा आशयाचे फोटो आणि मेसेज पाठवले होते.
हेही वाचा – SSC Board Exam : कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा, केंद्राच्या बाहेरील झेरॉक्स सेंटरवर उत्तर पत्रिकांच्या प्रिंट
कोणतीही विवाहित महिला, जी “प्रतिष्ठीत आणि (माजी) नगरसेविका” आहे किंवा तिचा पती असे व्हॉट्सअॅप मेसेज आणि अश्लील फोटो सहन करणार नाही. विशेषत: असे मेसेज पाठवणारा आणि तक्रारदार महिला एकमेकांना ओळखत नसेल हे अजिबात सहन करणार नाही. शिवाय, त्यांच्यात कोणतेही संबंध असल्याचे दर्शविणारे आरोपीकडून काहीही रेकॉर्डवर आणण्यात आलेले नाही, असे सांगत, मेसेज आणि कृती स्त्रीच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने अपमानजनक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
यापूर्वी, 2022मध्ये येथील एका दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्याने या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले. इतर कारणे देतानाच, राजकीय शत्रुत्वामुळे त्याला या प्रकरणात अकारण गोवण्यात आले असल्याचा दावा आरोपीने केला. तथापि, कोणत्याही पुराव्याद्वारे याची पुष्टी होत नसल्याचे सांगत न्यायालयने हा युक्तिवाद फेटाळून लावला. याशिवाय, कोणतीही महिला एखाद्याला खोट्या प्रकरणात अडकवून आपली प्रतिष्ठा पणाला लावणार नाही, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. आरोपीने महिलेला अश्लील WhatsApp मेसेज आणि छायाचित्रे पाठवली होती, हे सरकारी वकिलांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे, ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावणे योग्य ठरत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा – Politics : मुंडे-कोकाटेंमुळे महायुती अडचणीत, अधिवेशनापूर्वीच मविआला मिळाले आयते कोलीत