Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम विलेपार्ले गझाली फायरिंगप्रकरण: रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणार

विलेपार्ले गझाली फायरिंगप्रकरण: रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणार

Related Story

- Advertisement -

विलेपार्ले येथे गझाली हॉटेलमध्ये झालेल्या फायरिंगप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यास अखेर कर्नाटक कोर्टाने हिरवा कंदिल दिला आहे, त्यामुळे या फायरिंगच्या गुन्ह्यांत लवकरच रवी पुजारीचा ताबा घेऊन त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाणार आहे. या वृत्ताला खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अजय सावंत यांनी दुजोरा देताना लवकरच रवी पुजारीचा मुंबई पोलीस ताबा घेणार असल्याचे सांगितले. यापूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध मोक्का कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. विलेपार्ले येथील हनुमान रोडवर गझाली नावाचे एक हॉटेल आहे. 21 ऑक्टोंबर 2017 रोजी मनोहर सिद्धप्पा चौगुले हे कॅश काऊंटरवर होते, यावेळी रात्री अकरा वाजता तिथे एक तरुण आला, त्याचा दुसरा मित्र मोटारसायकलवर हॉटेलच्या बाहेर उभा होता. या तरुणाने त्याला एक कार्ड दिले, त्यात रवीभाई असे लिहिले होते, यह कार्ड तेरे अंदर बैठे बाप को देना, कॉल करने बोल, नही तो सिधा उपर भेज दूंगा अशी धमकी दिली. त्यानंतर काही कळण्यापूर्वीच या तरुणाने पिस्तूल काढून हवेत एक गोळी झाडली होती. गोळीबारानंतर ते दोघेही मोटारसायकलवरुन पळून गेले होते.

या गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविला होता. हा तपास हाती येताच फेब्रुवारी 2017 रोजी रवी पुजारीशी संबंधित सहा गुंडांना पोलिसांनी अटक केली होती. त्यात दिनानाथ नंदन जैस्वाल ऊर्फ दिनेश, धनपाल कृष्णा शेट्टीयार ऊर्फ डी. के ऊर्फ लंगडा ऊर्फ अण्णा, सुरेशकुमार पांडियन पिल्लई, मोहम्मद साबीर नूरमोहम्मद मोमीन, सुरेश मुथय्या पुजारी, रमेश किट्टा पुजारी आणि मृत्यूंजय नारायण दास ऊर्फ मोंटी यांचा समावेश होता. याच गुन्ह्यांत रवी पुजारीला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. तो विदेशात राहून स्वतच्या कारवाया सांभाळत होता. त्यामुळे त्याला विदेशातून भारतात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. याच दरम्यान रवी पुजारीला दक्षिण आफ्रिका येथील सेनेगल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याचा प्रत्यार्पणबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करुन त्याला भारतात आणण्यात आले होते. भारतात येताच त्याचा ताबा कर्नाटक पोलिसांनी घेतला होता, मात्र मुंबई पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात देण्याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून कोर्टात लढाई सुरु होती, रवी पुजारीच्या वकिलांनी त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यास विरोध करताना कोर्टात एक याचिका सादर केली होती. मात्र मुंबई पोलिसांनी कोर्टात प्रत्यार्पण प्रस्ताव सादर करुन तसेच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. या कागदपत्रांची शहानिशा केल्यांनतर कोर्टाने रवी पुजारीला मुंबई पोलिसांकडे चौकशीसाठी ताब्यात देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे त्याचा ताबा लवकरच मुंबई पोलिसांना दिला जाणार आहे.

- Advertisement -

रवी हा कर्नाटकच्या उडपी, मालपेचा रहिवाशी असून 1990 साली तो छोटा राजन टोळीसाठी काम करीत होता, याच दरम्यान त्याने छोटा राजनपासून फारकत घेऊन स्वतची टोळी बनविली होती, गुन्हेगारी जगतात स्वत: च्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी त्याने मुंबई, बंगलोर, मंगलोर येथील हॉटेल-बांधकाम व्यावसायिक, बॉलीवूड कलाकारांना खंडणीसाठी धमकी देण्यास सुरुवात केली होती, इतकेच नव्हे खंडणी देण्यास नकार देताच तो त्याच्या सहकार्‍यांच्या मदतीने गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता, त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीसाठी धमकी देणे, घातक शस्त्रे बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विलेपार्ले येथील गझाली हॉटेलच्या मालकाला त्याने खंडणीसाठी धमकी देताना दहशत निर्माण करण्यासाठी हॉटेलबाहेर गोळीबार केला होता, याच गुन्ह्यांत तो वॉण्टेड होता. अखेर त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात येणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत रवी पुजारीला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल, असे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय सावंत यांनी सांगितले.

 

- Advertisement -