घरक्राइमविरारमधील बँक मॅनेजरचा फरार मारेकरी पुन्हा गजाआड, साथीदारही ताब्यात

विरारमधील बँक मॅनेजरचा फरार मारेकरी पुन्हा गजाआड, साथीदारही ताब्यात

Subscribe

वसई कोर्ट परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या बँक मॅनेजरचा मारेकरी अनिल दुबेला त्याच्या साथिदारासह पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. २९ जुलै २०२१ च्या रात्री साडेआठच्या सुमारास विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या बँक मॅनेजरची हत्या करून कॅशियरला गंभीर जखमी करून बँक लुटून चाललेल्या अनिल दुबेला बँकेबाहेरच जमावाने पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. सध्या ठाणे सेंट्रल जेलमध्ये असलेल्या अनिल दुबेला शुक्रवारी दुपारी वसई कोर्टात आणले होते. त्यावेळी संरक्षणासाठी असलेल्या एका सहाय्यक फौजदाराच्या मदतीने सराईत चोरट्याच्या मोटार सायकलवर बुसून दुबे फरार झाला होता.

अनिल दुबेला पकडण्यासाठी गुन्हे शाखा तीनच्या पथकाने वेगवेगळी पथके तयार केली होती. रविवारी रात्री नालासोपारा पूर्वेकडील एका झोपडपट्टीतील घरातून अनिल दुबेला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चांद बादशाह अजीज खान (४२, रा. डांगे प्लाझा, नालासोपारा पश्चिम) यालाही अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

पळून जाण्याचा प्लान अनिल दुबेने आधीच चांद खानच्या मदतीने तयार केला होता. चांद खानवर चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच ठाणे सेंट्रल जेलमधून सुटून आला होता. जेलमध्येच अनिल आणि चांदची ओळख झाली होती. त्यावेळीच चांदने अनिल दुबेला पळून जाण्यास मदत करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार वसई कोर्टात तारखेसाठी अनिलला आणल्यानंतर संधी साधून चांदच्या मोटार सायकलवरून अनिल दुबे पळून जाण्यात यशस्वी ठरला.

अनिल दुबेचे शिक्षण नेपाळ आणि पंजाबमध्ये झाले होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी त्याची ओळख होती. याओळखीच्या फायदा घेऊन अनिल दुबे नेपाळ किंवा पंजाबमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पण, त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

- Advertisement -

सहाय्यक फौजदार शशिकांत धुरेवर कारवाई होणार का?

अनिल दुबेच्या पळून जाण्याच्या कटात चांद खानसह सहाय्यक फौजदार शशिकांत धुरे हेही सहभागी असल्याची तक्रार पोलीस हवालदार नारायण गाणेकर यांनी केली होती. त्यानंतर वसई पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबेने शशिकांत धुरेंच्या मोबाईलवरून चांद खानला फोन करून बोलावून घेतले होते. त्यानंतर इतर तीन पोलीस गार्डना गाडीत बसवून शशिकांत धुरे अनिल दुबेला घेऊन सार्वजनिक स्वच्छतागृहात गेले होते. त्याठिकाणी मोटार सायकल घेऊन चांद खान येऊन उभा राहिला होता. मोटारसायकलवरूनच चांदसह अनिल दुबे पळून गेला होता. त्यामुळे याकटात शशिकांत धुरेही सहभागी होता, असे नारायण गाणेकर यांनी तक्रारीत म्हटलेले आहे. त्यामुळे सहाय्यक फौजदार शशिकांत धुरेंवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्याच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.


‘ती’ जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला बोचतेय; नीलम गोऱ्हेंचं जहरी टीकास्त्र

विरारमधील बँक मॅनेजरचा फरार मारेकरी पुन्हा गजाआड, साथीदारही ताब्यात
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -