Baba Siddique Murder Case : मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आता महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गोळ्या झाडत त्यांना ठार मारणाऱ्या शूटरनेच त्यांच्या हत्येचे कारण सांगितले. प्रमुख शूटरने पोलिसांना अनमोल बिश्नोईचे नावही सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. दाऊद इब्राहिम सोबत असलेले संबंध आणि 1993 च्या मुंबई स्फोटात सहभाग असल्याच्या संशयावरून अनमोल बिश्नोईने राष्ट्रवादीचे नेता बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करण्यास सांगितले होते. या प्रकरणातील प्रमुख शूटर शिवकुमार गौतम याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात याची माहिती दिली. (why baba siddique got killed reveals anmol bishnoi gangster mumbai police)
महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला, दसऱ्याच्या दिवशी त्यांचा मुलगा – झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी, आतापर्यंत 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शूटर गौतमने दिलेला हा कबुलीजबाब हा या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या आरोपपत्राचा भाग आहे.
बाबा सिद्दिकी किंवा झीशान सिद्दिकी यांना मारण्याचे आदेश गौतमला देण्यात आले होते. आणि त्याबदल्यात त्याला 15 लाख देण्याचा वादा करण्यात आला होता. आपण पुण्यात भंगार गोळा करण्यासोबतच आपण सहआरोपी हरीश कुमार कश्यप सोबत सामान विक्रीचे काम करत असल्याचे गौतमच म्हणणे आहे. हे भंगाराचे दुकान चालवणाऱ्या कश्यपनेच आपली राहायची व्यवस्था केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याच काळात आपली ओळख प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर सोबत झाल्याचे त्याने सांगितले.
मी आणि माझा भाऊ बिश्नोई संघटनेसाठी काम करत असल्याचे शुभम लोणकरने शूटर गौतमला सांगितले होते. जून 2024 मध्ये शुभमने मला आणि धर्मराज कश्यपला सांगितले की, आम्ही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम केले तर आम्हाला 10 ते 15 लाख रु. मिळतील. याचा उल्लेख गौतमच्या कबुलीजबाबात करण्यात आला आहे. मी जेव्हा कामाबाबत विचारले तेव्हा, शुभमने आम्हाला बाबा सिद्दिकी किंवा त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकी यांना मारायचे असल्याचे सांगितले. मात्र, याव्यतिरिक्त त्यांनी कोणतीही माहिती मला दिली नाही.