इंस्टाग्रामवरची मैत्री महिलेच्या अंगलट; अपहरण करून जबरदस्ती लावले लग्न

विरारजवळील खर्डी गावात राहणारी महिला नवऱ्याशी भांडण झाल्याने महिन्याभरापूर्वी राजोडी येथील आईकडे आली होती. नोकरी करत असलेल्या त्या महिलेची इंस्टाग्रामवर दिनेश पुरी सोबत मैत्री झाली. त्याने तिला लग्नाचेही आमिष दाखवले होते.  दिनेश पुरीने तिला पोलीस दलात भरती करण्यासाठी ट्रेनिंग देण्याच्या बहाण्याने १२ जानेवारीला अहमदाबादला बोलावून घेतले.

palghar crime sexual assault on minor girl by 8 accused at palghar mahim police filed case under posco

 

वसईः वसईतील राजोडी गावातील विवाहितेला इंस्टाग्रामवरील मैत्री चांगलीच महागात पडली. इंस्टाग्रामवरील मित्राने पोलीस दलात भरती करण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन थेट राजस्थानमधील एका इसमाला विकले. तसेच त्याच्याशी लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अर्नाळा पोलिसांनी थेट राजस्थान गाठून पीडित महिलेची सुटका केली. तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विरारजवळील खर्डी गावात राहणारी महिला नवऱ्याशी भांडण झाल्याने महिन्याभरापूर्वी राजोडी येथील आईकडे आली होती. नोकरी करत असलेल्या त्या महिलेची इंस्टाग्रामवर दिनेश पुरी सोबत मैत्री झाली. त्याने तिला लग्नाचेही आमिष दाखवले होते.  दिनेश पुरीने तिला पोलीस दलात भरती करण्यासाठी ट्रेनिंग देण्याच्या बहाण्याने १२ जानेवारीला अहमदाबादला बोलावून घेतले. अहमदाबादला दिनेश पुरी आलाच नाही. त्याऐवजी स्टेशनवर तिला घ्यायला चेतन भारती, मसर पुरी, भावेश पुरी आले होते. तिला राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील शिवानी बालोत्रा या चेतन भारतीच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर १६ जानेवारीला जवळच्याच भिमनाल गावातील कोर्टात नेऊन तिचे चेतन भारतीशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.

लग्नानंतर चेतनने तिला एक लाख रुपयांमध्ये विकत घेतल्याची धक्कादायक माहिती दिली. लग्नानंतर चेतनने तिला स्वतःच्या घरात डांबून तिच्याशी तो जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवत होता. अखेर पीडितेने संधी साधून शेजारच्या एका इमसाच्या मोबाईलवरून कोल्हापूर येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीशी संपर्क साधला. तिने सर्व प्रकार बहिणीला सांगितला.

तिच्या बहिणीने आईला ही माहिती दिली. आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार आधीच अर्नाळा पोलीस ठाण्यात केली होती. आईने अर्नाळा पोलिसांना तिच्या जबरदस्ती विवाहाचा तपशील सांगितला. त्यानंतर अर्नाळा पोलिसांचे एक पथक राजस्थानमधील शिवानी बालोत्रा गावी रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अर्नाळा पोलिसांनी पीडितेची सुटका केली. आरोपी चेतन भारतीला ताब्यात घेऊन अर्नाळा पोलीस ठाण्यात आणले. पीडितेला तिच्या आईच्या ताब्यात दिले.

पोलीस चौकशीत चेतन भारतीने पीडितेला गावातीलच दिनेश पुरी, मसल पुरी, भावेश पुरी यांच्याकडून लग्नासाठी विकत घेतल्याची माहिती दिली. या टोळीचा शोध पोलीस घेत आहेत. या टोळीने अशाच पद्धतीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. अन्य आरोपींच्या अटकेनंतर अधिक माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.