तवांग संघर्षाआधी चिनी ड्रोनची घुसखोरी, सुखोईचे प्रत्युत्तर – ९ डिसेंबरला नेमकं काय झालं?

चिनी ड्रोनला हुसकावण्यासाठी भारताला सुखोई या लढाऊ विमानांचा वापर करावा लागला. त्यानंतरच चिनी सैनिकांनी यांगत्से प्रत्यक्ष ताबा रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

अरुणाचल प्रदेशमधील तवांगच्या यांगत्से येथे प्रत्यक्ष ताबा रेषेवर गेल्या शुक्रवारी (९ डिसेंबर) भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये जोरदार चकमक झाली. यात दोन्ही देशांतील सैनिक जखमी झाले असून जखमींमध्ये चीनी सैनिकांचा आकडा अधिक आहे.  यांगत्से भागात तब्बल ३०० चिनी सैनिक घुसले होते. यावेळी भारतीय सैन्याने त्यांना जशास तसे उत्तर दिले.  मात्र या चकमकीच्या काही दिवसआधी चिनी ड्रोनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चिनी ड्रोनला हुसकावण्यासाठी भारताला सुखोई या लढाऊ विमानांचा वापर करावा लागला. त्यानंतरच चिनी सैनिकांनी यांगत्से प्रत्यक्ष ताबा रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवरून वाद आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेश, पूर्व लडाख, गलवान, डोकलाम यांच्या सीमाभागावर चीन कायम आपला दावा करत आहे. यावरून २००६ मध्ये दोन्ही देशांचे सैनिक अनेकवेळा समोरासमोर आले आहेत. विशेष म्हणजे, लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर चिनी वस्तूंवर बॉयकॉट करण्यात आला. तेव्हापासून चीन भारत यांच्यातील तणाव अधिक वाढला आहे. चीन कायम भारताच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर कुरापती काढण्याचे काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत चिनी सैनिक यांगत्सेमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर सक्रिय झाले असून आक्रमक भूमिका घेत आहेत. तर चीनचे सर्व डाव हाणून पाडण्यासाठी भारतानेही आक्रमक पवित्रा घेतला असून या भागात शस्त्रास्त्र सज्जतेबरोबरच पायाभूत सुविधाृ आणि चीनी सैनिकांच्या हालचालींवर भारत लक्ष ठेवून आहे. नेमके हेच चीनला नको आहे. यामुळे या भागात सतत अशांतता निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे.

संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही आठवड्यांत दोन ते तीन वेळा चिनी ड्रोनने भारताच्या सीमारेषांवर हेरगिरी केली. यामुळे त्यांना हुसकावण्यासाठी सुखोई विमानांनी त्यांचा माग घेतला. त्यानंतर चिनी ड्रोन तिथून परतले. भारताच्या सीमारेषेवरून घुसण्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने चवताळलेल्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी यांगत्सेमधील प्रत्यक्ष ताबा रेषा पार केली आणि ते भारतीय हद्दीत घुसले. काटेरी जाळ्या लावलेल्या काठ्या-लाठ्या घेऊन चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भारतीय सैनिकांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले. यावेळी दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. त्यात २० भारतीय जवान जखमी झाले. त्यांच्या हातापायाला किरकोळ जखमा झाल्या. त्यांच्यावर गुवाहाटीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रत्युतरात चिनी सैनिक मात्र मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. दरम्यान, चकमकीनंतर दोन्ही देशातील कमांडरमध्ये शांततेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

दरम्यान, चीनने तवांगजवळील सीमरेषेवर गावं वसवले असल्याचं सॅटेलाईटने पाटवलेल्या फोटोत स्पष्ट  दिसत आहे.  तसेच या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम सुरु असून मोठी वसाहतच उभारण्याच्या तयारी चीन करत असल्याचे या फोटोत दिसत आहे.