₹ 2000 Note : नोटबंदीमागील भाजपाचा डाव आता फसला, चिदंबरम यांची जोरदार टीका

p.-chidambaram
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबर 2023पर्यंतची मुदत दिली आहे. यावरून काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलून देण्याची तयारी भारतीय स्टेट बँकेने केली आहे. यावरून माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) आधी नोटाबंदी केली, पण काळ्या पैशाला आळा घालण्यात यश मिळाले नाही. आता हे 2000 रुपये बंद करण्याचा निर्णय म्हणजे नवे नाटक आहे, अशी टीका त्यांनी केली.

सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत सूचनापत्र जारी केली आहे. 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही, असे एसबीआयने त्यात म्हटले आहे. त्यामुळे एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन सहजपणे नोटा बदलता येतील. यावरून चिदंबरम यांनी केंद्र सरकारला थेट सवाल केला आहे. ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार असतील तर, तुम्हाला ‘काळा पैसा’ शोधण्यात कशी मदत होईल, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा भाजपाचा डाव आता फसला असल्याची टीका त्यांनी केली.

सन 2016मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर लोकांनी लगेचच त्या घेणे बंद केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा नाहीत. दैनंदिन किरकोळ व्यवहारांसाठी या नोटा योग्य नव्हत्या, त्यामुळे लोक या नोटांपासून दूरच राहिले. मग या 2000 रुपयांच्या नोटा कोणी ठेवल्या आणि वापरल्या? हे आता स्पष्ट आहे. तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे, असे चिदंबरम म्हणाले.

दोन हजार रुपयांची नोट बदलण्याची व्यवस्था करून सरकारने आता काळा पैसा पांढरा करणे सोपे केले आहे. ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची व्यवस्था करून सरकारने काळा पैसाधारकांसाठी रेड कार्पेट अंथरले आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.