Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश ₹ 2000 Note : स्वयंघोषित विश्वगुरूंचे हे वैशिष्ट्य... विरोधकांचे टीकास्त्र

₹ 2000 Note : स्वयंघोषित विश्वगुरूंचे हे वैशिष्ट्य… विरोधकांचे टीकास्त्र

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) ₹ 2000ची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. आता नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झो़ड उठवली आहे. काँग्रेससह आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टीने आरबीआच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

आमचे नेते आधी कृती करतात, नंतर विचार करतात. (First Act, Second Think (FAST)) आपल्या स्वयंघोषित विश्वगुरूंचे हे वैशिष्ट्य असल्याचा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लगावला आहे. 8 नोव्हेंबर 2016च्या विनाशकारी तुघलकी आदेशानंतर, 2000 रुपयांच्या नव्या नोटा मोठ्या धूमधडाक्यात चलनात आणल्या होत्या आणि आता त्याच मागे घेतल्या जात आहेत, अशी टीका जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केली.

- Advertisement -

…हा मूर्खपणाचा निर्णय – चिदंबरम
आम्ही नोव्हेंबर 2016मध्ये जे बोललो ते खरे ठरले. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून सरकारने 2000 रुपयांची नोट चलनात आणली आणि हा मूर्खपणाचा निर्णय होता. येत्या काळात सरकारने पुन्हा 1000 रुपयांची नोट चलनात आणली तर मला आश्चर्य वाटणार नाही. 2000 रुपयांची नोट कधीच योग्य नव्हती. बहुतांश लोक ही नोट वापरत नव्हते. या नोटेचा वापर फक्त काळ्या पैशांसाठी करत होते, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केली आहे.

- Advertisement -

त्या आश्वासनांचे काय झाले? – पवन खेडा
देशवासींना त्रास देण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016चे भूत पुन्हा परत आले आहे. 2000 रुपयांच्या नोटेचे फायदे पंतप्रधानांनी समस्त देशवासींना सांगितले होते. आज त्याची छपाई थांबली असताना त्या सर्व आश्वासनांचे काय झाले? अशी पावले उचलण्यापूर्वी सरकारने त्यामागचा उद्देश सर्वांसमोर स्पष्ट केला पाहिजे. सरकारने आपला जनताविरोधी आणि गरीबविरोधी अजेंडा सुरूच ठेवला आहे. मीडिया सरकारला या निर्णयाबद्दल प्रश्न विचारेल अशी आशा आहे, असे काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा (Pawan Khera) यांनी म्हटले आहे.

…म्हणून पंतप्रधान सुशिक्षित असावा – केजरीवाल
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावर आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 2000च्या नोटा आणल्याने भ्रष्टाचार थांबेल, असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते आणि आता ते म्हणत आहेत की, 2000च्या नोटा चलनातून रद्द केल्यावर भ्रष्टाचार संपेल, असे ट्वीट त्यांनी केले आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की पंतप्रधान सुशिक्षित असावा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

चूक उशिरा समजली – अखिलेश यादव
काही लोकांना त्यांची चूक उशिरा समजते. 2000 रुपयांच्या नोटेच्या बाबतीतही असेच घडले आहे. परंतु याची किंमत देशातील जनतेने आणि अर्थव्यवस्थेने मोजली आहे. राज्यकारभार हा मनमानी पद्धतीने चालत नाही, तर तो शहाणपणाने आणि प्रामाणिकपणे चालतो, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केली आहे.

- Advertisment -