Corona: लॉकडाऊनचा फज्जा; दफन विधीसाठी जमले १ लाख लोकं एकत्र

या घटनेमुळे कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे

(Image credit: CNN)

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन असलं तरी काही लोकं नियमांचे उल्लंघन करून अजूनही लॉकडाऊनला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार बांगलादेशमध्ये घडला असून एका मौलानांच्या दफन विधीसाठी साधारण १ लाख लोकं एकत्रित येऊन लॉकडाऊनचा फज्जा उडवल्याचे चित्र दिसले.

अंत्यदर्शनासाठी आलेल्या लोकांचा शोध सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश मधील ब्राह्मणबेरिया जिल्ह्यात इस्लामिक पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी लॉकडाऊनचे नियमाचे उल्लंघन केले. हा प्रकार शनिवारी घडला असून अंत्यदर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांचा शोध सुरू आहे. दरम्यान पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक शाह अली फरहाद आणि ब्राह्मणबारीया पोलीस प्रवक्ते इम्तियाज अहमद यांनी १ लाख लोकं या दफन विधीसाठी एकत्र आल्याचे सांगितले. हजारो लोकं लोक ब्राह्मणबेरिया जिल्ह्यातील रस्त्यावर एकत्र जमले होते. यातील सर्वाधिक लोकं मौलाना जुबैर अहमद अन्सारी यांच्या अंतिम दर्शनासाठी घरातून बाहेर पडले होते. फक्त ब्राह्मणबेरिया नाही तर इतर भागातूनही लोकं या विधीसाठी एकत्र आले होते, असे इस्लामवादी पक्षाचे सह-सरचिटणीस मोहम्मद ममुनुल हक यांनी सांगितले.


Corona: मास्क घातलं नाही म्हणून दिव्यांग मुलाचा वडिलांनी घेतला जीव!

या प्रकारामुळे लॉकडाऊन नियम पायदळी तुडवले गेले असून या घटनेमुळे कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, पोलीस गर्दीवर नियंत्रण ठेवू न शकल्याचा आरोपही केला जात आहे. तर, प्रभारी अधिकारी व सहाय्यक अधीक्षकांना एवढ्या मोठ्या जमावाला एकत्र कसे येऊ दिले गेले याची चौकशी सुरू करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली, असे पोलीस प्रवक्ते सोहेल राणा यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये सध्या २ हजार ४५६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.