अहमदाबाद : गुजरातमध्ये तीन वर्षांपासून काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. सातत्याने होणारे पराभव आणि संघटनवाढीकडे होणाऱ्या दुर्लक्षावर देशाचे विरोधी पक्षनेते, राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही गुजरातच्या काँग्रेसला रस्ता दाखवू शकत नाही, अशी खंत राहुल गांधी व्यक्त केली आहे.
काँग्रेसला मार्ग सापडत नाही
राहुल गांधी म्हणाले, “मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण, गुजरातमध्ये काँग्रेसला मार्ग सापडत नाही. गुजरात काँग्रेसमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक जे जनतेसोबत उभे आहेत, ज्यांच्या मनात काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरे आहेत, ते जनतेच्या संपर्कात नाहीत, त्यांची इज्जत करत नाहीत. त्यातील काहीजणांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. जोपर्यंत या दोघांना वेगळे केले नाही, तोपर्यंत गुजरातची जनता आपल्यावर विश्वास ठेवणार नाही.”
आमच्याकडे बब्बर शेर आहेत
“गुजरातच्या जनतेला पर्याय हवाय. त्यांना बी टीम नको. माझी जबाबदारी या दोन्ही गटातील लोकांना ओळखून दूर करायची आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. आमच्याकडे बब्बर शेर आहेत. आपल्याला दोन्ही गटांना वेगळे करून कठोर कारवाई लागेल. 10, 15, 20, 30, 40 जणांना काढून टाकावे लागले, तर काढून टाकले पाहिजे. भाजपसाठी काँग्रेसमध्ये राहून काम करता, त्यापेक्षा बाहेर जाऊन काम करा. तुम्हाला तिथे जागा होणार नाही, ते तुम्हाला बाहेर फेकून देतील,” असा खोचक टोला राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांना लगावला आहे.
…तर हातातून काँग्रेसचे रक्त आले पाहिजे
“जय पराजयाची गोष्ट सोडून द्या. आपले जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांचा हात कापला तरी तिथून काँग्रेसचे रक्त आले पाहिजे. संघटनेची जबाबदारी, अशा लोकांकडे गेली पाहिजे. हे केल्यावर गुजरातची जनता आपल्या पक्षात येण्यास सुरूवात करेल. गुजरातशी आपल्याला निवडणुकीसंदर्भात बोलले नाही पाहिजे,” असे राहुल गांधींनी म्हटले.
…तोपर्यंत गुजरातची जनता निवडून देणार नाही
“30 वर्षापासून गुजरातमध्ये आपली सत्ता नाही. मी गुजरातमध्ये आल्यावर 2012, 2017, 2022 आणि 2017 च्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होते. पण, येथे प्रश्न निवडणुकीचा नाही. आपण आपली जबाबदारी पूर्ण करणार नाही, तोपर्यंत जनता आपल्याला गुजरातमध्ये निवडून देणार नाही. आपण गुजरातच्या जनतेला सत्ता मागितली नाही पाहिजे. जेव्हा आपण जबाबदारी पूर्ण करू तेव्हा गुजरातची जनता काँग्रेसला पाठिंबा देईल,” असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.