“मोदी हटाओ, देश बचाओ”चे पोस्टर्स लावल्याने दिल्लीत 100 एफआयआर दाखल

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी पोलिसांनी 100 एफआयआर नोंदवले आहेत. प्रिंटिंग प्रेस अॅक्ट आणि फॉरेस्टेशन ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत सर्व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

100 FIRs filed in Delhi for putting up posters saying

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी पोलिसांनी 100 एफआयआर नोंदवले आहेत. प्रिंटिंग प्रेस अॅक्ट आणि फॉरेस्टेशन ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत सर्व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या व्हॅनमधून या आशयाचे पोस्टरही जप्त करण्यात आले. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या काही भागात ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असे आशय लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्समध्ये छापखान्याचा तपशील नव्हता. पण आयपी स्टेट पोलीस स्टेशनच्या एका कॉन्स्टेबलने पप्पू मेहता नावाच्या व्यक्तीला पोस्टर लावताना पकडले. यावेळी या पप्पू मेहतासोबत पोस्टरचे 38 बंडल सापडले आहेत.

दरम्यान, आम आदमी पक्षाने पोलिसांच्या कारवाईला हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे. पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, “मोदी सरकारची हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. पोस्टरमध्ये मोदींजीवर एवढे काय आक्षेपार्ह लिहिण्यात आले आहे की, पोलिसांनी 100 एफआयआर दाखल केल्या आहेत. मोदींना माहित नसेल पण भारत हा एक लोकशाहीचा देश आहे. एका पोस्टरमुळे इतके काय घाबरायचे?” तर या प्रकरणी पोस्टर प्रकरणाबाबत आम आदमी पक्ष गुरुवारी (ता. २३ मार्च) आंदोलन करणार आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर होणाऱ्या या निदर्शनात अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक म्हणाले की, ‘दोन प्रिंटिंग प्रेस कंपन्यांना प्रत्येकी 50 हजार पोस्टर्स बनवण्याची ऑर्डर मिळाली होती. कंपन्यांशी संबंधित कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरापासून सोमवारी सकाळपर्यंत शहरातील विविध भागात असे अनेक पोस्टर्स लावले. छापखान्याचे नाव प्रसिद्ध न केल्याच्या कारणास्तव पोलिसांनी ज्या छापखान्यात हे पोस्टर छापले गेले त्या मालकांना अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पोस्टर छापण्याचा आदेश 17 मार्चला हे पोस्टर छापण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानंतर हे पोस्टर्स १९ मार्चच्या रात्री वेगवेगळ्या लोकांना शहरातील भिंतीवर चिकटवण्यासाठी देण्यात आले. पोस्टर्स चिकटवण्याचे काम 20 मार्चच्या सकाळपर्यंत सुरू होते. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सुद्धा असेच एक प्रकरण समोर आले होते. त्यावेळी दिल्लीत कोविड लसीकरण मोहिमेदरम्यान मोदींवर टीका करणारे पोस्टर्स लावण्यात आले होते. तेव्हा याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 30 जणांना अटक केली. तर 25 एफआयआर नोंदवण्यात आले.

काँग्रेसने सुद्धा या घटनेचा निषेध केला आहे. याबाबतचे ट्वीट काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटरवरून करण्यात आले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील पोस्टर लावण्यात आले आहे. यामुळे अनेक लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. कृपया करून असे पोस्टर लानण्यात येऊ नये,” असे ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – मध्य प्रदेशात व्यसनी पोपटांचा सुळसुळाट, अफूच्या पिकांवर मारतात चोच; शेतकरी संकटात