Omicron Variant: देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या १०० पार; ११ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव

101 Omicron cases across 11 states in India, says Health Ministry
Omicron Variant: देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या १०० पार; ११ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव

जगात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनची दहशत पसरली आहे. देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत १०१ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच ११ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव्ह अग्रवाल यांनी दिली.

तसेच ओमिक्रॉनसंदर्भात पुढे लव्ह अग्रवाल म्हणाले की, आतापर्यंत ९१ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. तसेच जिथे जिथे कम्युनिटी स्प्रेड होत आहे, तिथे ओमिक्रॉन डेल्टाला मागे टाकेल, असे डब्ल्यूएचओ म्हणाले आहे. जगात सर्वाधिक वेगाने कोरोना लसीकरण भारतात होत आहे.

गेल्या २० दिवसांपासून दररोज १० हजारांहून कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या एका आठवड्यात ०.६५ टक्के पॉझिटिव्हीटी केसेसची नोंद झाली आहे. सध्या देशात एकूण सक्रिय रुग्णांपैकी केरळमधील ४०.३१ टक्के रुग्ण आहेत.

कोरोनाच्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, अत्यावश्यक नसलेला प्रवास आणि मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळण्याची हीच वेळ आहे.

दिल्लीत आज १० नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या २०वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे २० पैकी १० रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंज्ञी सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.


हेही वाचा – महिलेच्या गर्भाशयात नाही तर लिव्हरमध्ये वाढतयं भ्रूण, डॉक्टरही चक्रावले