१०३ वर्षांच्या आजीबाईंची करोनावर मात, झाल्या ठणठणीत

जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या करोना व्हायरसची दहशत सर्वत्र पसरली आहे. करोना म्हणजे मृत्यू असंच चित्र उभं केलं जात असतानाच ज्या चीनमधील वुहान शहरात करोना जन्माला आला त्याच शहरात १०३ वर्षांच्या एका करोनाग्रस्त आजीबाईने मात्र या व्हायरसवर मात केली आहे. रुग्णालयात सात दिवस उपचार घेतल्यानंतर त्या पूर्णपणे ठणठणीत झाल्या असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाला हरवणाऱ्या त्या जगातील पहिल्या ज्येष्ठ महिला ठरल्या आहेत. झांग गुआंगफेंग असे त्यांचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी झांग यांची तब्येत अचानक खालावली. खोकला, ताप आणि अंगदुखीने त्रस्त असलेल्या झांग यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय चाचण्यांमध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. डॉक्टर जेंग युलान त्यांच्यावर उपचार करत होते. ज्यावेळी झांग रुग्णालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांना श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. पण काही दिवसातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. औषधोपचारांना त्या योग्य प्रतिसाद देत असल्याचे बघून डॉक्टरांनाही आनंद झाला. कारण वयस्क व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने करोना त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. पण झांग यांनी हा दावा खोटा ठरवत करोनावर मात दिली. त्यामुळे करोना बरा होऊ शकतो असा विश्वास बळावल्याचे वुहानमधील नागरिक सांगत आहेत.

दरम्यान झांग यांच्याआधी एका १०१ वर्षीय व्यक्तीलाही करोनाची लागण झाली होती. करोना झाल्यानंतर त्याला स्मृतीभंश, हायपरटेंशन आणि हृदयाविषयक समस्याही उद्भवल्या पण ती व्यक्ती बरी झाली. त्यानंतर मात्र अनेक करोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू झाले. पण झांग यांनी करोनावर विजय मिळवला. चीनमध्ये ८०,००० हून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली. त्यातील ३,००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.