CBSE 10th-12th Exams 2022: आता दोन सत्रांमध्ये होणार दहावी बारावी CBSE बोर्डाच्या परीक्षा

दोन्ही सत्रांच्या परीक्षांचे गुण एकत्र करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल

10th and 12th CBSE board exams 2022 will be held in two terms
CBSE 10th-12th Exams 2022: आता दोन सत्रांमध्ये होणार दहावी बारावी CBSE बोर्डाच्या परीक्षा

सीबीएसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या २०२२ वर्षाच्या परीक्षा दोन सत्रांध्ये घेणार असल्याचे घोषित केले आहे. यातील पहिल्या सत्राची परीक्षा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. CBSE बोर्डाकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने परीक्षेचा पॅटर्न, सिलॅबस आणि प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये देखील अनेक बदल केले आहेत.

CBSEने जारी परिपत्रकात असे म्हटले आहे की, २०२२च्या दहावी बारावी CBSE बोर्डाच्या परीक्षा दोन सत्रात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या सत्राची परीक्षा ही १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून १५ डिसेंबरला संपणार आहे. तर दुसऱ्या सत्राची परीक्षा या मार्च – एप्रिल महिन्यात होणार आहेत. दोन्ही सत्रांच्या परीक्षांचे गुण एकत्र करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल, असे CBSEबोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

CBSEने परीक्षेच्या सिलॅबसमध्ये देखील बदल केले आहेत. प्रत्येक सत्रात ५० टक्के पाठ्यक्रमाचा सहभाग असेल. नवीन सिलॅबसची घोषणा करताना CBSEने म्हटले आहे की, परीक्षेचा सिलॅबस कमी करण्यात येणार असून यासंदर्भात संपूर्ण माहिती CBSEच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात येईल.

कसा असेल पेपर पॅटर्न?

  • परीक्षेच्या पहिल्या सत्रात MCQ आधारित प्रश्न विचारण्यात येतील.
  • विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी ९० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
  • पहिल्या सत्रात ५०-६० प्रश्न विचारले जाऊ शकतात.
  • दुसऱ्या परीक्षा सत्रात थोडक्यात आणि संक्षिप्त प्रश्न विचारण्यात येतील. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २ तासाचा वेळ देण्यात येईल.
  • मार्च एप्रिल महिन्यात कोरोनाची परिस्थिती कायम राहिली तर दुसरी सत्र परीक्षा देखील MCQ प्रश्नांवर आधारित असेल असे सांगण्यात आले आहे.
  • पहिल्या सत्र परीक्षांच्या गुणांना कमी वेटेज असेल तर दुसऱ्या सत्र परीक्षांच्या गुणांना जास्त वेटेज असेल.

प्रॅक्टिकल परीक्षांचे स्वरुप कसे असेल?

CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्रातील प्रॅक्टिकल परीक्षा शाळा घेणार आहेत. मात्र दुसऱ्या सत्र परीक्षेच्या वेळेस कोरोना परिस्थिती आटोक्यात असेल तर प्रॅक्टिकल परीक्षा CBSE कडून घेण्यात येईल. मुलांच्या शाळेजवळील सेंटरवर परीक्षेला बोलावण्यात येईल, असे CBSE बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – पहिल्याच विमानाने चेन्नईहून १७४ प्रवासी शिर्डीत