रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ७८ दिवसांच्या पगाराएवढा मिळणार बोनस

11.58 lakh non-gazetted Railway employees will get Bonus equivalent to 78 days wages for the FY 2019-2020

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून भरघोस असं दिवाळीचं गिफ्ट मिळणार आहे. रेल्वेच्या सुमारे ११.५८ लाख नॉन-गॅजेटेड कर्मचार्‍यांना २०१९-२० या वर्षासाठी ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस मिळणार आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना मिळणाऱ्या प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (पीएलबी) ची एकूण रक्कम २०८१.६८ कोटी रुपये आहे, असा अंदाज लावण्यात आला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाने सर्व नॉन-गॅजेटेड रेल्वे कर्मचार्‍यांना (RPF/RPSF जवान वगळता) आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ७८ दिवसांच्या पगारा इतका बोनस देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

दसर्‍यापूर्वी बोनस मिळणार

बोनसच्या देयकासाठी निश्चित केलेल्या पगाराची जास्तीत जास्त मर्यादा दरमहा ७००० रुपये आहे. पात्र रेल्वे कर्मचार्‍यांकरिता जास्तीत जास्त रक्कम ७८ दिवसांसाठी १७९५१ रुपये आहे. बोनस भारतभर पसरलेल्या सर्व नॉन-गॅजेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दरवर्षी दसरा/दुर्गापूजाच्या सुट्यांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना हे पैसे दिले जातात. यावर्षीही हा बोनस दसर्‍यापूर्वी कर्मचार्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

यावर्षी कोविड कालावधीत रेल्वे कर्मचार्‍यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. श्रमिक विशेष गाड्या असो किंवा धान्य, खत, कोळसा इत्यादी आवश्यक वस्तूंची ने-आण असो रेल्वे कर्मचारी काम करत होते. यामुळे दरवर्षीप्रमाणे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी दिवाळी गिफ्ट दिलं जाणार आहे.