Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पश्चिम बंगालमधील हिंसाचारात १२ बळी

पश्चिम बंगालमधील हिंसाचारात १२ बळी

भाजप कार्यालयांची तोडफोड, जाळपोळ

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर तेथे हिंसाचाराच्या मोठ्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या हिंसाचारात १२ जणांचे बळी गेले आहेत. हिंसाचार करणार्‍यांनी भाजपच्या कार्यालयांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली असून काही कार्यालयात तोडफोड करण्यात आल्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर बंगालमधील हिंसाचाराचा निषेध म्हणून भाजप बुधवारी संपूर्ण देशभर निदर्शने करणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत ममता दीदींचे कार्यकर्ते हिंसक जल्लोष करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या घरांचे नुकसान करत आहेत. नंदीग्राम येथेही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून, भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला, असा दावा केला आहे. पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजप कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले, असे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -