घरदेश-विदेशकेंद्रीय मंत्री अमित शाहांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या वाहनांचा अपघात, १४ जणांचा मृत्यू

केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या वाहनांचा अपघात, १४ जणांचा मृत्यू

Subscribe

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या बसेसचा भीषण अपघात घडला आहे. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यामध्ये हा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. २४ फेब्रुवारी) तीन बसेस आणि एक ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमी असलेल्या ५० जणांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जखमींना भरती केलेल्या रुग्णालयाला भेट दिली. तसेच अपघातस्थळी जाऊन पाहणी देखील केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर या अपघातातील गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमी असलेल्या लोकांना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहनिया बोगद्याजवळील बरोखर गावाजवळ हा अपघात झाला. रेवा-सिधी बोगद्याजवळ हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने बाजूला उभ्या असलेल्या तीन बसेसवर हा ट्रक जाऊन धडकला. यामध्ये दोन बस उलटल्या, तर तिसऱ्या बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा अपघात भीषण असला तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना रेवा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

अपघातानंतर या ठिकाणची परिस्थिती गंभीर बनली होती. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदत करून जखमींना बाहेर काढले. पोलिसांना माहिती देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यापैकी ५२ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचे गांभीर्य पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तसेच काही लोक ट्रकखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बसमधील प्रवासी सतना येथील अमित शाह यांच्या कार्यक्रमातून परतत होते. सतना येथील कोल जमातीच्या शबरी उत्सवात सहभागी होऊन परतत असताना ही घटना घडली. मुख्यमंत्री चौहान हे सिधी आणि रीवा जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. संध्याकाळी 5.30 वाजता कार्यक्रम संपला, त्यानंतर सर्व बसेस निघाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सतना येथून रामपूर बघेलान आणि रेवा मार्गे या बसेस मोहनिया बोगद्याने सरळ जाणार होत्या. पण बोगद्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिधी जिल्ह्यातील चुरहट पोलीस स्टेशन हद्दीतील बरखडा गावाजवळ तीन बस काही काळ थांबल्या होत्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने तिन्ही बसेसला धडक दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Live Update : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, सिधी येथे बस उलटल्याने झालेल्या अपघाताची दुःखद बातमी मिळाली आहे. या अपघातातील मृत्युमुखींना भावपूर्ण श्रद्धांजली आणि कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी आणि या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर घटनास्थळी सिधी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. घटनास्थळी सिधी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि एसपी उपस्थित आहेत. रेवा आयुक्त आणि आयजी घटनास्थळी पोहोचले आहेत. रेवा मेडिकल कॉलेज आणि सिधी जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचारासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगी मी आणि राज्यातील जनता शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून ट्वीट करून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -