पहिल्याच विमानाने चेन्नईहून १७४ प्रवासी शिर्डीत

कोरोनामुळे खंडित झालेली शिर्डीतील विमानसेवा रविवारपासून झाली पूर्ववत

shirdi airport

शिर्डी – कोरोनामुळे खंडित झालेली शिर्डीतील विमानसेवा रविवार (दि.१०)पासून पूर्ववत झाली. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी विमानतळावर पहिले विमान चेन्नईहून १७४ साईभक्तांना घेऊन दाखल झाले. साईबाबा मंदिर ५ एप्रिल २०२१ रोजी बंद झाल्यानंतर भाविकांवर अवलंबून असलेल्या विमानसेवेलाही ब्रेक लागला होता. मात्र, साईबाब मंदिर सुरू होताच विमानसेवाही पूर्ववत झाल्याने साईभक्तांसह स्थानिक नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर ७ ऑक्टोबर रोजी साईबाबा मंदिर सुरू झाल्याची शिर्डी साईभक्तांनी गजबजली. अवघ्या चार दिवसात ५० हजारांहून अधिक साईभक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली. तीन दिवसानंतर शिर्डी विमानतळावर रविवारपासून विमानसेवा सुरू झाली. नियोजीत वेळापत्रकानुसार चैन्नई येथून आलेले पहिले विमान १७४ साईभक्तांना घेऊन रविवारी दुपारी ३.३० वाजता विमानतळावर दाखल झाले. भक्तांचा प्रतिसाद बघता टप्प्या टप्प्याने दिल्ली, हैद्राबाद शहरातुनही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँण्डींग व कार्गोसेवा देखील लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचे विमानतळाचे व्यवस्थापक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. प्रवासी प्रवेशद्वारावर येताच टॅक्सी युनियन व ग्रामस्थांनी प्रवासी भक्तांचा पेढे व शाल देऊन स्वागत केले.

साईबाबांकडे प्रार्थना

गेल्या अनेक महिन्यांपासून विमानतळ बंद असल्याने स्थानिकांचा रोजगार पुर्णतः ठप्प झाला होता. आता साईबाबा मंदिरासह विमानतळ सुरू झाल्याने आनंद झाला असून, प्रवासी भक्तांना पेढे वाटून आनंद साजरा केला. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये आणि विमानसेवा सुरळीत सुरू रहावी, अशीच प्रार्थना साईबाबा चरणी केली आहे.
– कानिफ गुंजाळ, अध्यक्ष टॅक्सी युनियन, शिर्डी विमानतळ