जम्मू-काश्मिरच्या शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

2 terrorists killed in encounter in jammu and kashmirs shopian
प्रातिनिधिक छायाचित्र

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील अवनीरा भागात आज सकाळपासून भारतीय सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस आणि लष्करांच्या संयुक्त कारवाईत हे यश प्राप्त झाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांची ओळख देखील पटविण्यात आली आहे.

पोलिसांनी पुढे सांगितले की, या भागात शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी शोध पथकावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर त्याला उत्तर देत असताना दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ज्या ठिकाणी चकमक झाली तिथून पोलिसांनी शस्त्र आणि दारुगोळ्याचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारला गेलेला एक दहशतवादी हा शोपियान जिल्ह्यातीलच शकीर अहमद तर दुसरा कुलगाल जिल्ह्यातील सयार भट नामक आहे. हे दोन्ही दहशतवादी अंसार गजावतुल हिंद (AGH) या संघटनेचे आहेत.

भारतीय लष्कराने सांगितल्याप्रमाणे, यावर्षी मे महिन्यापर्यंत काश्मीरच्या घाटीत १०१ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामध्ये २३ परदेशी तर ७८ स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. शोपियान जिल्ह्यात सर्वाधिक २५, पुलवामा १५, अवंतीपोरा १४ आणि कुलगावमध्ये १२ दहशतवादी मारले गेले आहेत. ज्या वेगाने दहशतवादी मारले जात आहे, तेवढेच नव्या संख्येने तरूण दहशतवादी संघटनेत सामील होत असल्याचेही सांगितले जात आहे. भारतीय लष्कराने यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.