केंद्रीय मंत्रिमंडळात २० नवीन चेहरे, महाराष्ट्र, यूपी आणि बिहारला प्राधान्य

pm narendra modi all party meeting discussion about farmer protest
'सरकार आंदोलक शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे'

केंद्रीय मंत्रिमंडळाचा या आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता आहे. यात २० नवे चेहरे झळकणार असून ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांबरोबरच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारला यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात प्राधान्य देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या नवीन मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे, आणि खासदार हीना गावित यांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर सध्या मंत्रिमंडळात असलेल्या काहीजणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या विस्तारात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशवर केंद्राचे विशेष लक्ष आहे. या राज्यातील नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची अधिक शक्यता आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे भाजपबरोबर असलेल्या अपना दल आणि निषाद पार्टीच्या नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेटही घेतली होती. दरम्यान, काँग्रेसला रामराम करत भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यांनाही आज मंगळवारी दिल्लीत तातडीने बोलावण्यात आले आहे. नारायण राणे हे ेदखील दिल्लीत पोहचले आहेत. तर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील हिमाचल दौरा सोडून दिल्लीत आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मोदी यांनी आपल्या मंत्र्याबरोबर दिर्घ चर्चा केली होती. या चर्चेत सर्व मंत्रालयाच्या कामकाजांचा आढावाही घेण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आले. पण त्यांनी या दुसऱ्या टर्ममध्ये एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नव्हता. यामुळे यावेळी मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.