होम क्वारंटाईनमध्ये कुटुंबाचा निष्काळजीपणा; २६ जणांना कोरोनाची लागण

नव्याने संक्रमित रूग्णांमध्ये, तरुणांसह लहान मुलांना पण कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

red zone

होम क्वारंटाईन असो किंवा कंटेनमेंट झोन असो, आपला निष्काळजीपणा कोरोनाविरूद्धच्या युद्धामध्ये आपल्या अंगलट येऊ शकतो. दिल्लीतील कोरोना हॉटस्पॉट जहांगीरपुरीमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जहांगीरपुरी येथे क्वारंटाईन केलेल्या एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याने या विषाणूविरूद्ध लढाईतील आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. नव्याने संक्रमित रूग्णांमध्ये, तरुणांसह लहान मुलांना पण कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रेड झोनमध्ये असूनही या कुटुंबातील लोक एकमेकांच्या घरी जात होते. एकमेकांच्या खोलीत जात होते आणि एकमेकांमध्ये मिसळत होते. आता या निष्काळजीपणाचा परिणाम असा आहे की संपूर्ण कुटुंबला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दरम्यान, दिल्लीच्या जहांगीरपुरीच्या सी ब्लॉकमध्ये एका महिलेच्या मृत्यूनंतर महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर, ६० हून अधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं. त्यापैकी २६ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी हा भाग सील करण्यात आला होता. या महिलेच्या मृत्यूनंतर तिला पुरण्यात आलं. या महिलेचा अहवाल नंतर आला आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. या महिलेचा मृतदेह ६ एप्रिलला आरएमएल रुग्णालयाने नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि ७ एप्रिल रोजी हा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा भाग आधीपासून हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट केला गेला आहे आणि पूर्णपणे सील करण्यात आला आहे.


हेही वाचा – हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेतल्यानंतर १० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली

क्वारंटाईनमध्ये निष्काळजीपणा, कोरोनाला निमंत्रण

जर आपण होम क्वारंटाईन असाल किंवा कंटेनमेंट झोनमध्ये आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी, सामाजिक अंतर पाळणे फार महत्वाचं आहे. घरात कमीतकमी एक मीटर अंतर ठेवा. होम क्वारंटाईन पिकनिक साजरा करण्यासारखा कोणताही कार्यक्रम नाही. जहांगीरपुरीच्या या परिवारानेही अशीच चूक केली असेल, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला.