इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटले; पोलीस कारवाईत 31 जणांचा मृत्यू

तेहरान : इराणच्या सदाचार पोलिसांच्या (Iran Morality Police) ताब्यातील महिलेचा मृत्यू झाल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे. या घटनेवरून गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शने सुरू असून पोलिसांच्या हिंसक कारवाईत सुमारे 31 जणांचा मृत्यू झाला आहे. निदर्शने अधिक तीव्र होत असल्याने इराणने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ब्लॉक केले आहे. तर, काही ठिकाणी इंटरनेट वापरावर बंधने आणली आहेत.

इराणमध्ये हिजाब परिधान केला नाही म्हणून महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीला 13 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. परंतु तीन दिवसांनंतर कारागृहात बेशुद्ध झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या छळामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. पण ती आजारी होती आणि आम्ही तिला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही.

मात्र, या घटनेमुळे आठवडाभरापासून येथील वातावरण तापले आहे. ड्रेस कोड कायद्याच्याविरोधात प्रामुख्याने महिला रस्त्यावर उतरल्या असून त्या हिजाबची जाहिररीत्या होळी करत आहेत. तर, काही महिला आपले लांब केस कापून निषेध व्यक्त करीत आहेत. तेहरानमध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर या आंदोलकांचे संघर्ष सुरू आहेत. त्यात जवळपास 31 जणांना जीव गमवावा लागला आहे. हे ध्यानी घेऊन प्रशासनाने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सेवा ब्लॉक केली आहे. विशेष म्हणजे, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, युट्यूब आणि टिकटॅक यासह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इराणने ब्लॉक केले आहेत. त्यामुळे केवळ इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅप या दोनच अॅपचा सर्वाधिक वापर होत आहे.

या सर्व प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील इराणवर टीका केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने महसा अमिनी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. इराणच्या सदाचार पोलिसांनी गस्त वाढविली असून ज्या महिला हिजाब परिधान करणार नाहीत, त्यांना लक्ष्य केले जात आहे, असे मानवधिकारने म्हटले आहे. तथापि, इराणने या सर्व टीका आणि आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.