कोरोना विषाणूचे ३७ प्रवासी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे.

corona virus suspect dies in kolhapur
करोना व्हायरस

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तसेच नवी मुंबईतील भरती असलेल्या एका रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या ३ जणांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात तर १ जण जिल्हा रुग्णालय, सांगली येथे आहे; अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २३ हजार ३५० प्रवाशांची तपासणी आतापर्यंत झाली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १६६ प्रवाशांपैकी ७२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. तसेच आवश्यक असल्यास मदतीसाठी हेल्पलाईन नंबर, आपत्कालिन नंबर देखील देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.