घरदेश-विदेशधार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 यूट्युब चॅनलवरील 45 व्हिडीओंवर बंदी

धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 यूट्युब चॅनलवरील 45 व्हिडीओंवर बंदी

Subscribe

नवी दिल्ली : धार्मिक विद्वेष पसरवण्याच्या उद्देशाने बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या 10 युट्यूब वाहिन्यांवरील 45 व्हिडिओंवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे युट्यूबला ही कारवाई करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम 2021च्या तरतुदींनुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 23 सप्टेंबरला 2022 रोजी हे निर्देश दिले असून या व्हिडीओंना 1 कोटी 30 लाखांहून अधिक एकत्रित प्रेक्षक संख्या मिळाली होती. हे व्हिडीओ देशाविरुद्ध सतत षडयंत्र रचत होते, देश तोडण्याचा प्रयत्न करीत होते. भीतीचे वातावरण तसेच भ्रम निर्माण करण्याचाही उद्देश त्यामागे होता.

- Advertisement -

खोट्या बातम्या आणि धार्मिक तेढ पसरवण्याच्या उद्देशाने मॉर्फ केलेले हे व्हिडिओ होते. सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतल्याचे खोटे दावे, धार्मिक समुदायांविरुद्ध हिंसक धमक्या, भारतात सांप्रदायिक युद्ध भडकल्याची घोषणा इत्यादींचा त्यात समावेश आहे. या व्हिडीओंमुळे देशातील धर्मिक सौहार्द तसेच देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची भीती होती.

- Advertisement -

काही व्हिडीओ अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र दले, भारताची राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मीर आणि अशाच संबंधित मुद्द्यांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरले जात होते. ही सामग्री भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या परदेशी देशांबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या दृष्टीकोनातून चुकीची आणि संवेदनशील असल्याचे आढळले होते.

काही व्हिडीओंमध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागांसह भारताची चुकीची सीमारेषा दाखवण्यात आली होती. नकाशाचे हे चुकीचे सादरीकरण भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी हानीकारक असल्याचे आढळले. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000च्या कलम 69 एच्या कक्षेत ही सामग्री समाविष्ट करण्यात आली. धार्मिक सलोखा बिघडण्याचा धोका असलेले 102 युट्यूब चॅनल, चार-पाच ट्विटर अकाऊंट्स, चार इन्स्टाग्राम आणि चार फेसबुक अकाऊंट यापूर्वीच ब्लॉक करण्यात आले आहेत, असे माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. जे-जे चॅनल अशा प्रकारचे व्हिडीओ प्रसारित करतील, त्यांच्याविरुद्धही भविष्यात कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -