भारतीय सैन्यांकडून ५० दहशतवाद्यांचा खात्मा; लॉकडाऊनमध्ये १८ जण ठार

terrorists killed
प्रातिनिधिक छायाचित्र

भारतीय सैनिकांनी वर्ष २०२० सुरुवातीपासून जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या चार महिन्यात जम्मू आणि काश्मिरमध्ये ५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये जैश-ए-मुहम्मद, लष्कर-ए-तोयबा सारख्या कुप्रसिद्ध संघटनेच्या मोठ्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ही कामगिरी केली असल्याची माहिती लष्करातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे. मात्र ही कामगिरी करत असताना भारतीय सैन्यातील १७ जवान शहीद झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या कारवाईत ९ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, वर्ष सुरु झाल्यापासून ५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या एका महिन्याच्या काळात १८ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा धोक्यातही भारतीय सुरक्षा दलाने हे अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे.

जानेवारी महिन्यातील २३ आणि २५ तारखेला मोठी कारवाई करण्यात आली होती. २३ जानेवारी रोजी पुलवामा जिल्ह्यात उच्च मिलिटंट कमांडर अबु सैफुल्लाह आणि त्याचा जोडीदार यासीरला ठार करण्यात आले होते. तर २५ जानेवारी रोजी जैशच्या कारी यासीर सोबत त्याच्या तीन साथीदारांना पुलवामाच्या ख्रेव परिसरात मारण्यात आले होते.

लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर मुझफ्पर अहमद भटसहीत चार दहशतवाद्यांना १५ मार्च रोजी ठार करण्यात आले. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्याया करावाईत मारण्यात आलेले हे दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाचे होते, असे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात देखील जैशचा टॉप कमांडर साजद नवाब दार याला बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार येथे यमसदनी पाठविण्यात आले. तर १४ मार्च पासून आतापर्यंत एकूण १८ दहशतवाद्यांना संपविण्यात आले आहे. २०१९ या वर्षाची तुलना करायची झाल्यास मागच्या वर्षी १६० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. तर १०२ जणांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.