मेघालय-नागालँडमध्ये 559 उमेदवार रिंगणात; 28 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

नवी दिल्ली : ईशान्येकडील मेघालय आणि नागालँड या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. मेघालयातील 60 जागांसाठी एकूण 375 उमेदवार रिंगणात आहेत, तर नागालँडमध्ये 184 उमेदवार रिंगणात आहेत. आकडेवारीवर नजर टाकल्यास 375 उमेदवारांपैकी 21 जणांवर गुन्हे दाखल आहेत. नागालँडमध्ये 184 पैकी फक्त सात उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

मेघालयात गारो नॅशनल कौन्सिलचे (GNC) सर्वाधिक 50 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या दोन टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तर, नागालँडमध्ये त्यापैकी आरपीपीचे 100 टक्के आणि काँग्रेसचे 4 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

मेघालयमध्ये भाजपा, काँग्रेस, एनपीपी आणि तृणमूल काँग्रेससह 13 राजकीय पक्षांचे एकूण 375 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 36 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मेघालय निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी 59 उमेदवार उभे केले आहेत, तर तृणमूल काँग्रेसने 56 उमेदवारांना तिकीट दिले आहे. याशिवाय, सीएम कोनराड के. संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपीचे 57, यूडीपीचे 46, एचएसपीडीपीचे 11, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे 9, गण सुरक्षा पार्टीचा एक, गारो नॅशनल कौन्सिलचे दोन, जनता दल (युनायटेड)चे तीन उमेदवार रिंगणात आहेत.

यामध्ये सर्वाधिक 50 टक्के कलंकित उमेदवार गारो नॅशनल कौन्सिलचे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या 17 टक्के उमेदवारांवर फौजदारी खटले आहेत. एनपीपीकडे 11 टक्के कलंकित उमेदवार आहेत. राष्ट्रीय पक्षांबद्दल बोलायचे तर काँग्रेसच्या सहा टक्के उमेदवारांवर आणि भाजपच्या दोन टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तृणमूल काँग्रेसचे पाच टक्के उमेदवार कलंकित आहेत.

नागालँडमध्ये 60 जागांसाठी एकूण 184 उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) यांनी युती केली आहे. याअंतर्गत एनडीपीपीने 40 जागांवर तर भाजपने 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय काँग्रेस आणि एनपीएफ स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने 23 आणि एनपीएफने 22 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. 19 अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. नागालँडमध्ये रायझिंग पीपल्स पार्टीने केवळ एका जागेसाठी उमेदवार उभा केला असून तोही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. याशिवाय एनडीपीपीचे दोन, काँग्रेस, एनपीएफ आणि भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार कलंकित आहे.

दोन्ही राज्यांत प्रत्येकी 59 जागांवर निवडणूक
दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. मात्र, आज, सोमवारी दोन्ही राज्यांत 59 – 59 जागांवर मतदान होत आहे. नागालँडमधील एक जागेवर भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. तर, यूडीपी उमेदवाराच्या मृत्यूमुळे मेघालयातील एका जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.