नवी दिल्ली : सरत्या वर्षाचा शेवटचा महिना हा विमान प्रवाशांसाठी जणू काळच बनून आला आहे. या एकाच महिन्यात जगभरात एकूण सहा अपघात झाले, आणि या सहा अपघातांमध्ये मिळून तब्बल 234 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गंभीर आणि चिंताजनक तर आहेच पण हवाई सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण करणारी देखील आहे. (6 horrific plane crashes including south korea plane crash azerbaijan brazil 234 deaths in december 2024)
ताजी घटना रविवार, 29 डिसेंबर रोजी सकाळची आहे. दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना एका विमानाला पक्ष्याची धडक बसली, त्यानंतर त्याच्या लॅंडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, हे विमान धावपट्टीच्या कुंपणाला जाऊन धडकले आणि या विमानातील 175 लोकांचा मृत्यू झाला. यात 83 महिला आणि 82 पुरूष आहेत. अजून 11 प्रवाशांची ओळख पटलेली नाही. विमानात एकूण 181 प्रवासी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजपर्यंत झालेल्या सर्वात भीषण अपघातांपैकी हा एक अपघात आहे. हे 15 वर्ष जुने बोइंग 737 – 800 जेट विमान होते जे बॅंकॉक वरून परत येत होते. स्थानिक वेळेनुसार हा अपघात सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी झाली.
हेही वाचा – Plane Crash : पक्षी धडकला अन्…दक्षिण कोरियातील विमान अपघाताचे कारण आले समोर
जेजू एअरच्या इतिहासातील ही पहिलीच मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी 2007 मध्ये जेजू एअरची बॉम्बार्डियर Q400 ही फ्लाईट जोरदार वाऱ्यांमुळे दक्षिणेकडील बुसान – गिम्हे विमानतळावर उतरवण्यात आली. या विमानात 74 प्रवासी होते, ज्यातील एक या अपघातात जखमी झाला.
कझाकस्तानात विमान दुर्घटना
आजचा अपघात होण्यापूर्वी नाताळच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला कझाकस्तान येथील अक्तौ विमानतळाजवळ अझरबैजान एम्ब्रेयर ERJ-190AR हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यात 38 प्रवासी मारले गेले. तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. ग्रोज्नी विमानतळावर अनेकदा उतरण्याचे प्रयत्न केल्यानंतर हे विमान अक्तौ विमानतळाजवळ जमिनीला धडकले. या विमानात 67 प्रवासी होते.
ब्राझील विमान अपघातात 10 जणांचा मृत्यू
दक्षिण ब्राझीलमधील ग्रामाडो शहरात एक खासगी विमान 22 डिसेंबर रोजी अपघातग्रस्त झाले. यात एकाच परिवारातील 10 जणांचा मृत्यू झाला. एका इंग्लिश वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, उतरताना हे विमान इमारतीला धडकले. या अपघातात विमानातील प्रवाशांच्या मृत्यूसोबतच 17 नागरिक जखमी झाले.
पापुआ न्यू गिनी येथे पाच प्रवाशांचा मृत्यू
नॉर्थ कोस्ट एव्हिएशनकडून संचालित ब्रिटन – नॉर्मन बीएन – 2बी – 26 आयलॅंडर 22 डिसेंबर रोजीच पापुआ न्यू गिनी येथे अपघातग्रस्त झाले. यात विमानातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान प्रायोगिक तत्त्वावर उडवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी या विमानाचे अवशेष सापडले. या अपघाताचा तपास अजूनही सुरू आहे.
अर्जेंटिनात लॅंडिंगच्यावेळी विमानाचा अपघात
अर्जेंटिनातील सॅन फर्नांडो विमानतळाजवळ बॉम्बार्डियर BD-100-1A10 चॅलेंजर 300 अपघातग्रस्त झाले. यात दोन्ही वैमानिक मारले गेले. हे विमान सॅन फर्नांडोला जात होते. उड्डाण करतानाच हे विमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि कुंपणाला धडकले. यामुळे विमानाला आग लागली आणि त्याचा उजवीकडचा भाग तुटून वेगळा झाला.
हेही वाचा – Shivaji Maharaj Statue : अभिमानास्पद ! चीनच्या सीमेवजळ उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा
होलोलुलू विमानतळाजवळ इमारतीला धडकले विमान
कामाका एअर एलएलसीच्या कामाका एअर सेसना 208 हे विमान होनोलुलू मधील डॅनिएल येथील इनौये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अपघातग्रस्त झाले. यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर लगेचच या वैमानिकांचे विमानावरील नियंत्रण सुटले, आणि ते इमारतीला जाऊन धडकले. प्रशिक्षणादरम्यान हा अपघात झाला.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar