Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चंद्र आला कवेत!

चंद्र आला कवेत!

Subscribe

भारताचे चंद्रावर ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंग, ४१ दिवसांची मोहीम यशस्वी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पराक्रम करणारा भारत पहिलाच देश

भारत आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)च्या संशोधनातील ऐतिहासिक क्षण अखेर सत्यात उतरला. चांद्रयान-३च्या लँडर मॉड्यूलने बुधवारी सायंकाळी ६.०४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करताच भारत! मी माझे डेस्टिनेशन गाठले आणि तू सुद्धा… असा मेसेज केला अन् बंगळुरूच्या कमांड सेंटरमध्ये उपस्थित शेकडो शास्त्रज्ञ आणि कोट्यवधी देशवासीयांचा जल्लोष सुरू झाला. २०१९ मधील चांद्रयान-२ मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आलेले अपयश पुसून काढत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ मोहिमेद्वारे चंद्रावर तिरंगा फडकावला.

चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरला, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा भीष्म पराक्रम करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. चांद्रयान-३ मोहीम ४१ दिवसांत फत्ते झाली. इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी ‘इंडिया ऑन द मून’ अशा ३ शब्दांतच पंतप्रधान मोदींना मोहीम फत्ते झाल्याची पहिली खबर दिली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हणत इस्रोचे शास्त्रज्ञ आणि १४० कोटी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

२०१९ साली भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेला शेवटच्या टप्प्याला अपयश आल्याने देशवासीयांची निराशा झाली होती, मात्र या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नव्याने आखणी केली होती. इस्रोचे शास्त्रज्ञ मागील ४ वर्षांपासून चांद्रयान-३ मोहिमेवर काम करत होते. देशात कोविड-१९ संकट पसरले असताना इस्रोची टीम मिशन मूनच्या तयारीत व्यस्त होती. सुमारे १ हजार अभियंते आणि शास्त्रज्ञ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटत होते.

इस्रोचे शिलेदार
चांद्रयान-३ यशस्वी करण्यासाठी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्यासह प्रकल्प संचालक पी. वीरमुथुवेल, मिशन डायरेक्टर मोहना कुमार, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक एस. उन्नीकृष्णन नायर, यू.आर. राव सॅटेलाईट सेंटर (यूआरएससी) संचालक एम. शंकरन आणि लॉन्च ऑथोरायझेशन बोर्ड, लॅब प्रमुख ए. राजराजन या शिलेदारांचा मोलाचा वाटा होता.

- Advertisement -

असा झाला चांद्रयान-३ चा यशस्वी प्रवास
=१४ जुलै- दुपारी ३.३५ वाजता श्रीहरिकोटा येथून शक्तिशाली एलएमव्ही रॉकेटमधून प्रक्षेपण
=१५ जुलै, १७ जुलै, १८ जुलै, २० जुलै आणि २५ जुलै या दिवशी टप्प्याटप्प्याने चांद्रयान-३ पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षांमध्ये ढकलण्यात आले.
=१ ऑगस्ट – चांद्रयान-३ पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने रवाना.
=५ ऑगस्ट- चंद्राच्या कक्षेत पोहोचत चांद्रयान-३ चा चंद्राच्या कक्षांमधून पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरू.
=१७ ऑगस्ट- लँडर मॉड्यूल आणि प्रॉपल्शन मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे झाले.
=१८ ऑगस्ट- चांद्रयानाची पहिली डीबूस्टिंग प्रक्रिया पार पडली.
=२० ऑगस्ट- दुसरी डीबूस्टिंग प्रक्रिया पार पडून विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यासाठी जागा शोधू लागले.
=२३ ऑगस्ट- लँडरने चंद्रापासून ३० किमी उंची गाठली.
=लँडरने चंद्राच्या अंतिम कक्षेपासून २५ किमीचा प्रवास ३० मिनिटांत पूर्ण केला. लँडरचा वेग कमी करत हळूहळू खाली उतरवण्यात आले.
=५ वाजून ३० मिनिटांनी रफ लँडिंग खूप चांगले झाले. यानंतर ५ वाजून ४० मिनिटांनी लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून उभ्या स्थितीत आले. यावेळी लँडर चंद्रापासून ३ किमी अंतरावर होते.
=अखेर लँडरने ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.
=चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी ४१ दिवस लागले. पृथ्वीपासून चंद्राचे एकूण अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे.

तीन शब्दांतच यशोगाथा
चांद्रयान-३ ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्याच्या ऐतिहासिक क्षणाची माहिती इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरून दिली.‘इंडिया ऑन द मून’ अशा ३ शब्दांतच त्यांनी पंतप्रधान मोदींना मोहिम फत्ते झाल्याची पहिली खबर दिली. तसेच चांद्रयान-३ प्रकल्पाच्या मागे ज्यांची मेहनत होती ते प्रकल्प संचालक पी. विरामुथुवेल यांच्यासह इतर सर्व जबाबदार्‍या सोपवलेल्या वैज्ञानिकांचे त्यांनी आभार मानले.

चंद्रानंतर आता थेट सूर्याचा अभ्यास
आपण आपल्या सौरमंडळाच्या सीमांचे सामर्थ्य पाहणार आहोत. मानव जातीसाठी ब्रम्हांडाच्या अनेक संभावनांना साकार करण्यासाठी काम करणार आहोत. आपण भविष्यासाठी अनेक मोठे आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठरवले आहेत. लवकरच सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी इस्रो आदित्य एल वन मिशन लॉन्च करणार आहे. यानंतर, शुक्रही इस्रोच्या लक्ष्यावर आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

चंद्रावर अशोक स्तंभाची छाप
धूळ ओसरल्यानंतर विक्रम लँडर इस्त्रोशी संवाद साधेल. त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर रॅम्पवरून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. यानंतर त्याची चाके चंद्राच्या मातीवर ‘अशोक स्तंभ’ आणि ‘इस्रो’च्या लोगोची छाप सोडणार आहे. त्यानंतर विक्रम लँडर प्रज्ञानचा फोटो घेईल आणि प्रज्ञान विक्रमचा फोटो काढेल. हे फोटो पृथ्वीवर पाठविण्यात येतील.

चंदा मामा एक टूर के
हा क्षण भारताच्या ताकदीचा आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. अमृत काळात अमृताचा वर्षाव झाला. आपण पृथ्वीवर एक प्रतिज्ञा घेतली आणि ती चंद्रावर साकार केली. अंतराळात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे आपण साक्षीदार आहोत. चंदा मामा दूर के नहीं, एक टूर के झाले आहेत.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लँडर, रोव्हरचे पुढचे काम…

चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर आता संशोधनाचा पुढचा टप्पा कार्यान्वित झाला आहे. लँडरमधून रोव्हरला उतरवणे आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून फिरवणे तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर इन-सीटू वैज्ञानिक प्रयोग करणे ही पुढील आव्हाने आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर, रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर विविध चाचण्या करतील. या अभियानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. अल्गोरिदमही सुधारण्यात आले आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर ७ प्रकारच्या उपकरणांनी सुसज्ज आहेत.

चंद्रयान-३ चे लँडर २ मीटर लांब, २ मीटर रुंद, १ मीटर ११६ सेमी उंच आणि १७४९ किलो वजनाचे आहे. चंद्रयान-३च्या दळणवळणात लँडर महत्त्वाची भूमिका बजावेल कारण हे लँडर रोव्हर सोबतच चंद्रयान-२ वेळी प्रक्षेपित केलेल्या ऑर्बिटरशी देखील संवाद साधेल. याशिवाय, तो बंगळुरूजवळील बेलालू येथील भारतीय डीप स्पेस नेटवर्कशी थेट संवाद साधेल.

एका दिवसांत संशोधन
लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर दोघांचेही आयुष्य केवळ एका दिवसाचे असेल. म्हणजे चंद्रावरील एका दिवसात सर्वकाही संशोधन केले जाईल. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. (चंद्रावर एक दिवस आणि एक रात्र असं चक्र पूर्ण होण्यासाठी पृथ्वीवरचे २८ दिवस लागतात.)

लँडरवरील उपकरणे:
रंभा एलपी- चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्माची (आयर्न आणि इलेक्ट्रॉन) विविध वेळेत घनता तपासणे.
चेस्ट- चंद्राच्या ध्रुवानजीकच्या प्रदेशाचे औष्मिक गुणधर्म तपासणे.
इल्सा- स्थानकाच्या भागातील भूकपांच्या नोंदी घेउन चंद्राच्या कवचाचा अंदाज बांधणे.

रोव्हरवरील उपकरणे:
एलआरए-लेजर रेट्रोरिफ्लेक्टर ऐरे
एपीएक्सएक्स- चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक गुणधर्म तपासणे आणि खनिजांचा अभ्यास करणे.

प्रोपल्शन मॉड्यूलवरील उपकरणे
लिब्स-चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि दगडांमधील मूलद्रव्य शोधणे.
शेप- हे उपकरण प्रोपल्शन मोड्यूलसोबत चंद्राभोवती फिरत राहील आणि इतर दूरच्या ग्रहांचे स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक सिग्नलद्वारा निरिक्षण करेल. तिथे पृथ्वीसारखे जीवन आहे का याचा शोध घेईल. प्रोपल्शन मॉड्युलमध्ये बसवलेल्या एस बँक पॉन्डरवर गोळा केलेली माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्क पर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. हे उपकरण ३ ते ६ महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल.

मुंबई-गोवा महामार्गापेक्षा कमी खर्च
चांद्रयान- १ या चंद्रावरील पहिल्या यशस्वी मोहिमेचे बजेट ८०० कोटी होते. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरले नव्हते. तर चंद्रयान-३ मोहिमेचे बजेट अवघे ६१५ कोटी रुपये आहे. १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा मार्गासाठी आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले जाते. याचाचा अर्थ एवढ्या खर्चात चांद्रयानच्या किमान २५ मोहीमा आपण केल्या असत्या.

चंद्रावर स्वारी करणे का अवघड ?
मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि इतर वायूंचे वातावरण तरी आहे. परंतू चंद्रावर वातावरणच नसल्याने चंद्रावर स्वारी करणे हे मंगळावर स्वारी करण्यापेक्षा अवघड मानले जाते. आतापर्यंत चंद्रावर मानव पाठविण्यात केवळ अमेरिकेला यश आले आहे. २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहीले पाऊल टाकले. तेव्हापासून १९६९ ते १९७३ पर्यंत चंद्रावर अमेरिकेचे १२ अंतराळवीर जाऊन आले आहेत.

लुना २

सोव्हिएत युनियनने १९५९ मध्ये प्रक्षेपित केलेला लुना-२ हा चंद्राच्या कक्षेत जाणारा पहिला कृत्रिम उपग्रह होता. या मोहिमेद्वारेच चंद्राच्या पृष्ठभागावर कोणतेही चुंबकीय क्षेत्र नसल्याचे स्पष्ट झाले.

लुना ३

लुना २ च्या यशानंतर, १९५९ मधील लुना ३ या मोहिमेतून चंद्राच्या पृष्ठभागावर मोठे खड्डे असल्याचे समोर आले.

सर्वेअर प्रोग्राम
अमेरिकेच्या नासाने १९६६ आणि १९६८ दरम्यान चंद्रावर सर्वेअर प्रोग्राम चालवला. ज्या अंतर्गत ७ मानवरहित विमाने पाठवली गेली. या सर्वांनी चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट-लँड करत चंद्राची माती आणि थर्मल वैशिष्ट्यांचा डेटा गोळा केला.

अपोलो ८
नासाने १९६८ मध्ये प्रक्षेपित केलेले हे मिशन फ्रँक बोरमन, जेम्स लोवेल आणि विल्यम अँडर्स यांच्यासह चंद्राभोवती फिरणारे पहिले मानवयुक्त अंतराळयान होते. या मिशनने भविष्यातील मोहिमांचा पाया घातला.

अपोलो ११
नासाची १९६९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली, ही एक अमेरिकन अंतराळ मोहीम होती. यातून मानव पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचला. यात अंतराळवीर होते नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन.

अपोलो १३
१९७० मध्ये ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. परंतु हे मिशन अयशस्वी झाले.

अपोलो १५
१९७१ मधील या मोहिमेतूनच नासाने चंद्रावर आपले लुनार रोव्हर उतरवले, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाविषयी वैज्ञानिक माहिती गोळा करण्यात मदत झाली.

अपोलो १७
नासाने १९७२ मध्ये प्रक्षेपित केलेले हे मिशन अपोलो प्रोग्राममधील शेवटचे मिशन होते. यातून चंद्राचे नमुने गोळा करण्यात आले होते.

चांगई ४
चीनने २०१९ मध्ये हा उपग्रह लाँच केला, जो यशस्वीरित्या चंद्रावर उतरला. या मोहिमेने चंद्राचा भूगर्भ आणि संरचनेबद्दल बरीच माहिती दिली.

चांद्रयान-२
भारताने २०१९ मध्ये चांद्रयान-२ लाँच केले. त्यात ऑर्बिटर, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचा समावेश होता. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. मात्र, लँडिंगपूर्वी लँडरमध्ये बिघाड झाल्याने लँडिंग अयशस्वी झाले.

- Advertisment -