घरदेश-विदेशउत्तर भारतात वीज कोसळल्याने ६८ जणांचा मृत्यू

उत्तर भारतात वीज कोसळल्याने ६८ जणांचा मृत्यू

Subscribe

राजस्थानमध्ये २१ , उत्तर प्रदेश ४१, मध्य प्रदेश ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

राजस्थान, उत्तप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यात रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ६८ हून अधिक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. राजस्थानच्या जयपूर, झालावाड आणि धौलपूर जिल्ह्यात या वीज दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेतील ११ जणांचा मृत्यू हा एकट्या जयपूरमध्ये झाला आहे. तर उत्तरप्रदेशातील कानपूर, देहात, फहेतपूर, कौशांबी, फिरोजाबाद, उन्नाव, हमीरपूर, सोनभद्र, प्रतापगड हरदोई आणि मिरजापूर येथे वीज कोसळून तब्बल १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याचबरोबर मध्य प्रदेशातीलही वेगवेगळ्या जिल्ह्यात रविवारी वीज कोसळून सात जण दगावले आहेत. उत्तरप्रदेशातील श्योपुर, ग्वाल्हेर, अनूपपुर, बैतुल, शिवपुरी अशा वेगवेगळ्या भागांत मुसळधार पावसासह वीज कोसळल्याने ७ जण दगावले आहेत.

अमेर फोर्टवर सेल्फीचा आनंद घेणाऱ्या ११ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जयपूरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान अमेर किल्ल्याजवळ काही तरुण-तरुणींचा ग्रुप पावसाचा आनंद घेत होते. याचवेळी वॉच टॉवरवर सेल्फी घेणाऱ्या तरुणांच्या अंगावर वीज कोसळून यातील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलं. अशी माहिती जयपूरचे पोलिस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी दिली आहे.

- Advertisement -

वैद्यकीय आणि आरोग्यमंत्री आढावा घेण्यासाठी रुग्णालयात दाखल

अमेर किल्ल्याजवळ वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा आढावा घेण्यासाठीर राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयात पोहोचले. यावेळी चीफ व्हिप डॉ.महेश जोशी, आमदार अमीन कागजी हे उपस्थित होते. जखमींच्या उपचारासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

वीज कोसळून झाडाखाली आसरा घेणाऱ्या ४ जणांचा मृत्यू

झालवाड जिल्ह्यातील कंवास पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गरडा गावात पावसाच्या हजेरीने अनेक जणांना आडोसा घेऊ उभे होते. यावेळी एका झाडाखाली ४ जणांवर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राधे बंजारा उर्फ ​​बावला (१२), पुखराज बंजारा (वय १६), विक्रम (१६) आणि त्याचा भाऊ अखराज (१३) अशी मृतांची नावे आहे. तर एक गाय आणि सुमारे १० बकऱ्यांचाही यात मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मेंढपाळावर वीज कोसळली, दोन म्हशींचा मृत्यू

कोसळून जखमी झालेल्या राहुल, विक्रम, राकेश, मानसिंह आणि फुलीबाई या तरुणांना उपचारांसाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. याचदरम्यान राजस्थानमधील जहालवार येथील लालगौन येथे शेळ्या चरायला नेणाऱ्या तारासिंग भिल या २३ वर्षीय मुलावरही वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर यात दोन म्हशी दगावल्या आहेत. तर सुनेल पोलीस स्टेशन परिसरातील चाचाना गावात वीज पडून दोन अल्पवयीन मुली जखमी झाल्या आहेत.

शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या २ सख्या भावांसह १ मुलांचा मृत्यू
धौलपुर जिल्ह्यातील बारी उपविभाग परिसरातील कुदिन्ना गावांत वीज कोसळल्याने दोन सख्ख्या भावांसह एकूण ३ मुलांचा मृत्यू झाला. शेळ्या चरायला नेत असतानाही ही दुर्घटना घडली. लवकुश (१५), विपिन (१०), भोलू (८) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केले दु:ख 

राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनांसंदर्भात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, कोटा, धौलपूर, झालावाड़, जयपूर आणि बारामध्ये वीज कोसळल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे. पीडित कुटुंबियांबद्दल मी संवेदनशीलता व्यक्त करत देव त्यांना हे दु:ख पचवण्याचे सामर्थ्य देऊ. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींनाही मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्यपाल कलराज मिश्रा यांनीही दुःख व्यक्त केले

राजस्थानमध्ये वीज कोसळ्याने झालेल्या दुर्घटनेवर राज्यपाल कलराज मिश्रा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अमेर किल्ल्यावर वॉच टॉवरमध्ये सेल्फी घेताना वीज कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेत राज्यपालांनीही शोक व्यक्त केला आहे. पावसाचे दिवस पाहता नागरिकांनी सुरक्षेसंबंधीत खबरदारी घेण्याचे आवाहनही राज्यपालांनी केले आहे.

वीज कोसळल्याने उत्तप्रदेशात ४१ जणांचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशात वीज कोसळल्याने एकूण ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या दमदार पावसात वीज कोसळल्याने वेगवेगळ्या घटनांमध्ये १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यात कानपूर देहात आणि फतेहपूर एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर कौशांबीमध्ये चार जणांचा, फिरोजाबादमध्ये तीन, उन्नाव, हमीरपूर आणि सोनभद्र येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच कानपूर नगरात प्रत्येकी दोन आणि प्रतापगड हरदोई आणि मिरजापूर येथे प्रत्येकी एक अशा एकूण ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशात ७ जण दगावले

राजस्थान, उत्तर प्रदेशप्रमाणे मध्य प्रदेशातीलही वेगवेगळ्या जिल्ह्यात रविवारी वीज कोसळून सात जण दगावले आहेत. यातील श्योपुर आणि ग्वाल्हेर जिल्ह्यात प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. तर अनूपपुर, बैतुल आणि शिवपुरी जिल्ह्यात प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.

पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत केली जाहीर

उत्तर भारतात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपय निधी देण्याची घोषणा केली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची आर्थिक मदत मंजुर केली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. यावर पंतप्रधानांनी लिहिले की, “राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब अत्यंत दुख:द आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो.”


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -