Homeदेश-विदेशJallikattu : जलीकट्टू खेळादरम्यान 7 जणांसह 2 बैलांचा मृत्यू, तर 400 हून...

Jallikattu : जलीकट्टू खेळादरम्यान 7 जणांसह 2 बैलांचा मृत्यू, तर 400 हून अधिक लोक जखमी

Subscribe

जलीकट्टू खेळादरम्यान एकाच दिवसात सात जणांसह दोन बैलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच गर्दीतून बैलांना पळवण्याच्या या खेळात 400 हून अधिक जण जखमी देखील झाले आहेत.

नवी दिल्ली : पोंगल सणानिमित्त तामिळनाडूच्या विविध जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (16 जानेवारी) जलीकट्टू खेळाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सणाला गालबोट लागले आहे. कारण जलीकट्टू खेळादरम्यान एकाच दिवसात सात जणांसह दोन बैलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच गर्दीतून बैलांना पळवण्याच्या या खेळात 400 हून अधिक जण जखमी देखील झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. (7 dead over 400 injured during Jallikattu game in Tamil Nadu)

पोंगल सणानिमित्त यंदा 2025 सालचा पहिला जल्लीकट्टू पुडुक्कोटाईच्या गंदरवाकोट्टई तालुक्यातील थाचनकुरीची गावात सुरू करण्यात आला. यानंतर त्रिची, दिंडीगुल, मनपराई, पुडुकोट्टई आणि शिवगंगा सारख्या जिल्ह्यांमध्ये देखील जलीपट्टूचे आयोजन करण्यात आला. दरवर्षी या खेळात 600 हून अधिक बैल सहभागी होतात. मात्र गुरुवारी या खेळादरम्यान, पुडुक्कोटाई आणि शिवगंगा येथे 7 जणांसह 2 बैलांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यात बैलांचे मालक आणि हा खेळ पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा समावेश आहे.

हेही वाचा – Aadhaar Card : आधार कार्डच्या मदतीने मिळवा 10,000 रुपयांचं कर्ज; ‘असा’ करा अर्ज

पोलिसांनी सांगितले की, शिवगंगा जिल्ह्यातील मंजुविरट्टू येथील नादुविकोट्टई किल्ला अवंतीपट्टी गावातील थानिश राजा हे जलीकट्टू खेळात सहभागी होण्यासाठी त्यांचा बैल घेऊन आले होते. मात्र शेतातून पळून जाताना कंबानूर येथील एका विहिरीत त्यांचा बैल पडला. यावेळी थानिश राजा यांनी आपल्या बैलाला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. तर पुडुकोट्टईच्या अलंगनल्लूरमध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला बैलाने जखमी केले. या जखमी प्रेक्षकाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जलीकट्टूदरम्यान आणखी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

जल्लीकट्टू म्हणजे काय? आणि हा खेळ कसा खेळला जातो?

दरम्यान, जल्लीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. यामध्ये बैलांना नियंत्रित करण्याची स्पर्धा असते. हा खेळ पोंगल सणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच मट्टू पोंगलला आयोजित केला जातो. ‘जल्लीकट्टू’ हा शब्द ‘जल्ली’ (सोन्या-चांदीची नाणी) आणि ‘कट्टू’ (बांधलेले) या शब्दांपासून बनला आहे. बैलाच्या पाठीला नाण्यांची एक पिशवी बांधली जाते आणि या खेळात सहभागी होणारे स्पर्धक बैलाला नियंत्रित करून ती पिशवी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. खेळादरम्यान, बैलाला गर्दीत सोडले जाते आणि स्पर्धक बैलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. बैलाला नियंत्रित करणाऱ्या स्पर्धकाला आणि सर्वात शक्तीशाली बैलाला बक्षिस दिले जाते. या खेळात प्रामुख्याने पुलिकुलम आणि कांगयम जातीच्या बैलांचा वापर केला जातो. जिंकलेले बैल बाजारात चढ्या किमतीत विकले जातात आणि प्रजननासाठी देखील वापरले जातात.

हेही वाचा – Arvind Kejriwal : आमचे सरकार आले तर, केजरीवालांची आणखी एक मोठी घोषणा