भाजपचं केंद्रीय मंत्रिमंडळ Arnab Goswami च्या पाठिशी, ९ मंत्र्यांनी केला अटकेचा निषेध!

arnab goswami anvay naik suicide case
अर्णब गोस्वामी

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आज सकाळी त्यांच्या वांद्रेच्या घरातून अलिबाग पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राज्यभर या घटनेचे संमिश्र पडसाद उमटू लागले आहेत. सगळीकडून अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर संमतीची प्रतिक्रिया येत असतानाच भाजपकडून मात्र अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहेच. मात्र, भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. याची सुरुवात खुद्द केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनीच केली. अटकेनंतर काही वेळातच अमित शहांनी याचा निषेध करणारं ट्वीट केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीचा अपमान केला आहे. राज्यातील यंत्रणेचा वापर करून अर्णब गोस्वामी यांना अटक करणं हा वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीचा चौधा स्तंभ असलेल्या माध्यमांवर देखील हल्ला आहे. यातून आम्हाला आणीबाणीच्या काळाची आठवण झाली. माध्यम स्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जाईल.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर

महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. माध्यमांना तुम्ही अशा प्रकारे वागवू शकत नाही. आणीबाणीच्या काळात माध्यमांना अशाच पद्धतीने वागवलं जात होतं. काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा अशा मानसिकतेसाठी आम्ही निषेध करतो.

महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी

माध्यमांमधील जे कुणी आज या अटकेचा निषेध करणार नाहीत, ते फॅसिझमलाच पाठिंबा देत असल्याचं सिद्ध होईल. तुम्हाला अर्णब गोस्वामी आवडत नसतील. तुम्ही त्यांच्याशी सहमत नसाल. तुम्ही त्यांचं अस्तित्वच नाकारत असाल. पण जर तुम्ही शांत रहाल, तर तुम्ही दबावाला पाठिंबा द्याल. जर उद्या ही वेळ तुमच्यावर आली, तर कोण बोलेल?

कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद

अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेली अटकेची कारवाई ही निंदनीय, अनावश्यक आणि चिंताजनक आहे. १९७५म्ये आणीबाणीच्या काळात देखील आम्ही माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह

लोकशाहीच्या पडद्याआड आपण पुन्हा फॅसिझम आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहोत का? अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार फक्त अर्णब गोस्वामी यांना तातडीने सोडू शकते.

क्रीडा राज्यमंत्री किरण रिजिजू

फक्त तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही म्हणून तुम्ही त्याला अटक कशी करू शकता? या प्रकारच्या वर्तनाचा भारतीय विरोध करतील हे लक्षात ठेवा. अर्णब गोस्वामींच्या बळजबरीने केलेल्या अटकेचा मी निषेध करतो.

रेल्वेमंत्री पियुष गोयल

महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. ही फॅसिस्ट प्रवृत्ती महाराष्ट्रातल्या अघोषित आणीबाणीचच प्रतिक आहे. हे सत्तेचा दुरुपयोग करण्याचं उदाहरण आहे. आपण सगळ्यांनी भारतीय लोकशाहीवर झालेल्या या हल्ल्याचा विरोध करायला हवा.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण

महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार इंदिरा गांधींचा आणीबाणीचा काळ पुन्हा आणतंय का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वयंघोषित पालक या प्रकरणात कुठे गेलेत?

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

या आणीबाणीच्याच छटा आहेत. अर्णब गोस्वामी यांची अटक हा माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला आहे. ज्यांना कुणाला स्वातंत्र्यावर विश्वास आहे, त्यांनी आता बोलायला हवं.