घरदेश-विदेशराष्ट्रवादी, तृणमूलला झटका, राष्ट्रीय स्तरावरील आघाड्यांच्या राजकारणात काँग्रेसचे महत्त्व वाढले?

राष्ट्रवादी, तृणमूलला झटका, राष्ट्रीय स्तरावरील आघाड्यांच्या राजकारणात काँग्रेसचे महत्त्व वाढले?

Subscribe

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबरोबरच तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (Communist Party of India) राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा आगामी लोकसभा निवडणुकीतील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अवघ्या दीड वर्षाच्या अंतराने तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष राजकीय क्षितिजावर उदयास आले. काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. तर, सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाला विरोध करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, हे विशेष. त्यातही दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, ज्यांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता काढून घेण्यात आली आहे, त्या तीनपैकी तृणमूल काँग्रेस आणि भाकपा या दोन पक्षांनी 1977पासून पश्चिम बंगालची सत्ता कायम आपल्या हाती ठेवली.

- Advertisement -

आता 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे भाजपाविरोधात आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षातील जास्तीत जास्त लोकांची एकजूट व्हावी, ही माझी इच्छा आहे. लोकं एकत्र आल्यानंतर ताकदीने लोकसभा निवडणूक लढू, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. तथापि, तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांना काँग्रेसविना ही आघाडी हवी असल्याचे सांगण्यात येते.

दुसरीकडे, केसीआर यांनीही आपल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) माध्यमातून भाजपाविरोधात विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी आपल्या तेलंगण राष्ट्रीय समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले आहे. त्याच दृष्टीने बीआरएसने महाराष्ट्रात देखील शिरकाव केला आहे. पण निवडणूक आयोगाने या पक्षाची आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता काढून घेतली आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपा यांच्यापासून समान अंतर राखून इतर प्रादेशिक पक्षांशी संभाव्य चर्चा करण्याची भूमिका तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना बरोबर घेत व्यक्त केली होती. त्यावर ‘भाजपशी लढण्यासाठी कोणतीही विरोधी आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही,’ असे प्रत्युत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिले होते.

आजच्या घडीला राज्यातील महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांना निवडणूक आयोगाकडून दणका बसला आहे. त्यामुळे काँग्रेसचे महत्त्व वाढण्याची शक्यता आहे. त्यातही, हिंडेनबर्ग आणि अदानी वाद तसेच राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी याचे भांडवल करत काँग्रेस भाजपाविरोधात आक्रमक झाले आहे. या सर्व गोष्टी ध्यानी घेता, ज्यांना बाजूला ठेवून आघाडी करण्याची तयारी तृणमूल काँग्रेस आणि बीआरएस करीत होती, त्यांना आता काँग्रेसला बरोबर घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -