CCTV : वाहतुकीचा नियमभंग केल्याच्या चलानने केला कुटुंबातील शांततेचा भंग

थिरुवनंतपुरम : केरळमधील राजधानी थिरुवनंतपुरमच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही (CCTV) आता डोकेदुखी ठरत आहेत. यावरून एका दाम्पत्यात झालेला वाद इतका शिगेला पोहोचला की, पत्नीने पतीविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्याआधारे त्या व्यक्तीला अटक केली.

इडुक्की (Idukki) येथील एक रहिवासी 25 एप्रिल रोजी हेल्मेट न घालता आपल्या मैत्रिणीला (woman friend) सोबत घेऊन स्कूटीने जात होता. यादरम्यान त्याने वाहतूक नियमांचा भंग केला आणि ते रस्त्यावरील वाहतूक विभागाच्या (Motor Vehicle Department) सीसीटीव्हीत कैद झाले. संबंधित स्कूटी पत्नीच्या नावावर नोंदणीकृत असल्याने पतीच्या वाहतूक नियमभंगाच्या चलानचा तपशील तिच्या मोबाईलवर पाठवण्यात आला. त्यासोबत त्या ठिकाणचे चित्रही जोडले होते. हा ‘सचित्र’ मेसेज मिळताच पत्नीने पतीला प्रश्न केला की, या फोटोत मागे बसलेली महिला कोण आहे?

हेही वाचा – नाही तर ते म्हणतील आम्ही त्यांचे वकील आहोत की काय; राऊतांचा पुन्हा पवारांना टोला

या महिलेचा 32 वर्षीय पती एका कपड्याच्या दुकानात काम करतो. त्याने हा फोटो पाहताच सरळ-सरळ हात झटकले. या महिलेशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा त्याने केला. आपण फक्त तिला स्कूटरवर ‘लिफ्ट’ दिल्याचे त्याने सांगितले. मात्र, पत्नीचा यावर विश्वास बसला नाही आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघांमध्ये एवढी बाचाबाची झाली की, हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.

करमना पोलीस ठाण्यात त्या महिलेने आपल्या पतीवर मारहाणीचा आरोप केला. पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. विशेष म्हणजे, ‘सेफ केरळ’ या रस्ते सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत राज्यातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून राजकीय वादंग रंगलेला आहे. कॅमेरे बसवण्याच्या कंत्राटाबाबत विरोधी पक्ष काँग्रेसने राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता ते नागरिकांनाही त्रासदायक ठरू लागले आहेत.