घरदेश-विदेश1971च्या युद्धाच्या वेळीच पीओकेबद्दलचा निर्णय घ्यायला हवा होता, राजनाथ सिंह यांचे मत

1971च्या युद्धाच्या वेळीच पीओकेबद्दलचा निर्णय घ्यायला हवा होता, राजनाथ सिंह यांचे मत

Subscribe

सिमला : पाकिस्तानसमवेत 1971मध्ये झालेल्या युद्धाच्या वेळीच पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरबद्दल (पीओके) निर्णय घ्यायला हवा होता, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी व्यक्त केले. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथे शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी हे मत व्यक्त केले.

आपण नुकताच 1971च्या युद्धातील विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. हे युद्ध इतिहासात कायमच लक्षात राहील. कारण ते संपत्ती, भूभागाचा ताबा किंवा सत्तेच्या बदल्यात लढले गेले नाही. तर केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून लढले गेले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या 90,000हून अधिक सैनिकांना भारताने कैद केले होते, तरीही भारताने पीओके पाकिस्तानकडून परत घेतले नाही, हे खेदजनक आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

- Advertisement -

सशस्त्र दलात कार्यरत राहून देशाची सेवा करताना वीरमरण पत्करणाऱ्या, मूळच्या हिमाचल प्रदेशमधील शूर सैनिकांच्या कुटुंबीयांचा राजनाथ सिंह यांनी सत्कार केला. हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा जिल्ह्यात बडोली येथे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. परमवीरचक्राचे पहिले मानकरी मेजर सोमनाथ शर्मा (1947), महावीरचक्र विजेते ब्रिगेडियर शेर जंग थापा (1948), परमवीरचक्र विजेते लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा (1962), परमवीरचक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा (1999) आणि परमवीरचक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार (1999) या योद्ध्यांना संरक्षणमंत्र्यांनी आदरांजली अर्पण केली.

- Advertisement -

अतुलनीय शौर्य आणि बलिदान करणाऱ्या या सर्व वीरांची नावे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरलेली आहेत. या शूर सैनिकांनी केलेल्या बलिदानाबद्दल देश त्यांचा सदैव ऋणी राहील, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी या वीरांच्या कुटुंबीयांबद्दल आदराची भावना व्यक्त केली. शिस्त, कर्तव्यनिष्ठा, देशभक्ती आणि त्याग ही सशस्त्र दलाची वैशिष्ट्ये आहेत आणि सशस्त्र दल हे राष्ट्राभिमान आणि विश्वासाचे प्रतीक आहे, त्यामुळे लोकांना, विशेषत: तरुणांना सशस्त्र दल हे नेहमीच प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले. या सैनिकांची पार्श्वभूमी, धर्म आणि पंथ अशा गोष्टींनी फरक पडत नाही, आपला प्रिय तिरंगा उंच फडकत राहिला पाहिजे, ही भावना सर्वात जास्त महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत हा एकमेव देश आहे, ज्याने संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला आहे आणि आपल्या शौर्यामुळे भारतीय सैन्य जगभरात आदरास पात्र ठरले आहे. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण तो भ्याड आहे किंवा युद्धाला घाबरला आहे, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही किंवा इंचभर परकीय भूमी काबीज केलेली नाही, मात्र आपल्या देशातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे संरक्षणमंत्र्यांनी बजावले.

संपूर्ण जगासह आपणही कोविड-19 साथरोगाचा मुकाबला करत होतो, त्याच वेळी आपल्याला देशाच्या उत्तर सीमेवर चीनमुळे तणावाचा सामना करावा लागला. कितीही मोठी सत्ता असली तरी भारत झुकणार नाही, हे गलवान प्रसंगाच्या वेळी आपल्या जवानांच्या धैर्याने सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -