Homeदेश-विदेशDelhi Election 2025 : जमत नसेल तर मोडून टाका इंडि आघाडी...आप-कॉंग्रेसमध्ये खटके,...

Delhi Election 2025 : जमत नसेल तर मोडून टाका इंडि आघाडी…आप-कॉंग्रेसमध्ये खटके, अब्दुल्ला भडकले

Subscribe

या निवडणुकीसाठी दिल्लीतील सत्ताधारी आप आणि कॉंग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यातच या दोन्ही पक्षांमधील वाढता संघर्ष पाहता जम्मू - काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विरोधी इंडि (INDIA) आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

श्रीनगर : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची नुकतीच घोषणा झाली आहे. महिन्याभरात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी दिल्लीतील सत्ताधारी आप आणि कॉंग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यातच या दोन्ही पक्षांमधील वाढता संघर्ष पाहता जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विरोधी इंडि (INDIA) आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (aap and congress clashed in delhi elections omar abdullah said disband india if its over)

अब्दुल्ला म्हणाले की, ही आघाडी जर केवळ लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित होती, तर आता ती मोडून टाकली पाहिजे. दिल्लीत काय सुरू आहे, याबाबत मी काहीच बोलू शकत नाही. कारण दिल्लीतील निवडणुकांशी आमचा काहीच संबंध नाही. दिल्ली विधानसभेत लढणाऱ्या आप, कॉंग्रेस आणि अन्य पक्षांनी हे ठरवायला पाहिजे की, भाजपाशी कशापद्धतीने लढा द्यायचा आहे. यापूर्वी दोन वेळा येथील निवडणुकांमध्ये आपच विजयी ठरली होती.

हेही वाचा – Delhi Election 2025 : माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला…वादात सापडल्यावर काय म्हणाले चव्हाण

इंडि आघाडीच्या भविष्याबाबत टिप्पणी करत अब्दुल्ला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाला विरोध करण्यासाठी जेव्हा सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडि आघाडी तयार करायचे ठरवले तेव्हा ही आघाडी किती काळ टिकेल याबाबत काहीही ठरवले नव्हते. त्यातही अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे या आघाडीची कोणतीही बैठक सध्या होताना दिसत नाही. यामुळे आघाडीचे नेतृत्व, त्याचा अजेंडा आणि एकूणच आघाडी याबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याचेही अब्दुल्ला म्हणाले.

दिल्लीच्या विधानसभा निवडणुका झाल्या की इंडि आघाडीच्या सगळ्या पक्षांना एकत्र बोलावून याबाबत निश्चित निर्णय व्हायला हवा. त्यातही केवळ लोकसभा निवडणुकीसाठी जर या आघाडीची बांधणी झाली असेल तर ती मोडलेलीच बरी. कारण, विरोधी पक्षांमध्ये कोणत्याच मुद्द्यावर एकवाक्यता दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

ओमर अब्दुल्ला यांचे हे विधान अशावेळी समोर आले आहे जेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी आप आणि कॉंग्रेसमध्ये ताण-तणाव सुरू आहे. यामुळे आघाडीच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – Delhi Election 2025 : पृथ्वीराज चव्हाणांच्या भविष्यवाणीवर कॉंग्रेस भडकली; संदीप दीक्षित म्हणाले…

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. दिल्लीत कॉंग्रेस स्वतंत्ररित्या निवडणूक लढवते आहे. येथे 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. लोकसभेत इंडि आघाडी म्हणून एकत्र लढलेले आप आणि कॉंग्रेस या निवडणुकीत मात्र स्वतंत्ररित्या लढणार आहेत.