लुधियाना (पंजाब) : लुधियाना पश्चिम विधानसभेचे आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा शुक्रवारी (ता. 10 जानेवारी) रात्री मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळी लागून आमदार गोगी यांचा मृत्यू झाला असून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. गोगी घरी परवाना असलेले पिस्तूल साफ करत असताना गोळी त्यांच्या डोक्याच्या आरपार गेल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलेली असली तरी त्यांच्याकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे. (AAP MLA Gurpreet Bassi shot dead under suspicious circumstances)
मिळालेल्या माहितीनुसार, लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले गुरप्रीत बस्सी गोगी यांनी शुक्रवारी संध्याकाळी पक्षाचे राज्यसभा खासदार संत बलवीर सिंह सीचेवाल यांची बुध दर्या येथे भेट ङेतली. यानंतर ते काही कार्यक्रमांमधये सहभागी झाले. ज्यानंतर ते रात्री उशिरा घरी आले. घरी आल्यानंतर आमदार गोगी यांनी नोकराला जेवण तयार करण्यास सांगितले आणि ते आपल्या खोलीत गेले. पण याच्या काही वेळातच त्यांच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. या आवाजानंतर लगेच गोगी यांची पत्नी डॉ.सुखचैन कौर, मुलगा व नोकर खोलीत आले. यावेळी गोगी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
हेही वाचा… Polling in Parli : अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नसतील, आव्हाडांकडून आणखी एक व्हिडीओ शेअर
आमदार गोगी यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र काही वेळाने त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त जितेंद्र जोरवाल आणि पोलीस आयुक्त कुलदीप चहल यांनी रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर अधिकारीही गोगी यांच्या घरी गेले. एडीसीपी जसकरण सिंह तेजा यांनी सांगितले की, पिस्तूल 25 बोअरचे होते. आमदाराचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला हे सांगणे सध्यातरी घाईचे ठरू शकते. तर कोणत्याही नैराश्यामुळे आमदाराने आत्महत्या केली असेल, असे तरी अद्यापही दिसत येत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
कोण होते आमदार गोगी?
पंजाब विधानसभा निवडणूक 2022 मध्ये आमदार गुरप्रीत बस्सी गोगी हे लुधियानाच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री भारतभूषण आशू यांचा पराभव केला. गोगी यांना सुमारे 40 हजार मते मिळाली होती. गोगी 2022 च्या निवडणुकीपूर्वी आपमध्ये सामील झाले होते. याआधी ते 23 वर्षे काँग्रेस पक्षात होते. ते तीन वेळा महापालिकेत नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी डॉ. सुखचैन बस्सी याही एकदा नगरसेवक झाल्या आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात गोगी यांना पंजाब स्मॉल इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट कॉर्पोरेशन (PSIEC) चे अध्यक्षपद देण्यात आले होते. याआधी ते 2014 ते 2019 या काळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही होते.