Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशAAP : परिस्थिती बिकट! आपच्या कार्यालयाला तीन महिन्यांपासून टाळे, प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकारी अनभिज्ञ

AAP : परिस्थिती बिकट! आपच्या कार्यालयाला तीन महिन्यांपासून टाळे, प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकारी अनभिज्ञ

Subscribe

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये असलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यालयाला घरमालकाने कुलूप लावले आहे. तीन महिन्यांपासून ऑफिसचे भाडे दिले गेले नाही. तसेच, विजेचे बिलदेखील थकीत होते. वारंवार विनंती करूनही हे पैसे अदा केले नाही म्हणून हे पाऊल उचलल्याचा दावा घरमालक दिलीप यांनी केला आहे.

भोपाळ : दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आम आदमी पार्टी (AAP) अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली निवडणुकीत पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, आता परस्थिती अशी आहे की, आम आदमी पार्टीच्या मध्य प्रदेशच्या भोपाळमधील कार्यालयाला टाळे लागले आहे. विशेष म्हणजे, याबद्दल प्रदेशाध्यक्षांसह इतर पदाधिकारी अनभिज्ञ असल्याचे समोर आले. (AAP : Office locked in Bhopal due to non-payment of rent)

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये असलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यालयाला घरमालकाने कुलूप लावले आहे. तीन महिन्यांपासून ऑफिसचे भाडे दिले गेले नाही. तसेच, विजेचे बिलदेखील थकीत होते. वारंवार विनंती करूनही हे पैसे अदा केले नाही म्हणून हे पाऊल उचलल्याचा दावा घरमालक दिलीप यांनी केला आहे. त्यामुळे आता त्या दरवाजावर दोन कुलूपे आहेत. एक आप पदाधिकाऱ्यांनी लावलेले तर, दुसरे घरमालकाने लावलेले. माझी थकबाकी मिळाल्यानंतर हे कुलूप काढून घेईन, असे दिलीप यांनी स्पष्ट केले.

भोपाळमधील आपचे कार्यालय एका भाड्याच्या घरात चालत होते. आपच्या प्रदेशाध्यक्षा रीना अग्रवाल यांना विचारले असता त्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. सुभाष नगर येथील प्रदेश कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याचे मला माहिती नाही. भोपाळच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे, असे रीना अग्रवाल म्हणाल्या. आपचे भोपाळ जिल्हाध्यक्ष सीपी सिंह चौहान यांनीही याबाबत अनभिज्ञता दाखवली.

मध्य प्रदेश आपचे सहसचिव रमाकांत पटेल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना, पक्षाकडे निधी नसल्याचे सांगितले. आपण प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा हे सर्व घडते. पण ही स्थिती सुधारेल. आम्ही प्रामाणिक आहोत. सध्या आमच्या पक्षाकडे निधी नाही. स्थानिक निधीतूनच पक्षाचे कामकाज केले जाते. सध्या आमच्या कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे रमाकांत पटेल म्हणाले. तर, भाजपा प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपबरोबर काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. आपच्या मध्य प्रदेशमधील कार्यालयाला कुलूप लागले आहे, त्यानंतर पुढचा नंबर काँग्रेसचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Thackeray Vs Shinde : शिंदेंच्या अमृत काळातील भ्रष्ट व्यवहारांना फडणवीसांकडून स्थगिती, ठाकरेंचा हल्लाबोल