नवी दिल्ली : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (27 डिसेंबर) त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मक्कीचे जमात-उद-दावा कमांडर हाफिज सईदशी जवळचे संबंध होते. तसेच मक्की हा हाफिज सईदचा मेहुणा होता. (Abdul Rehman Makki dies of heart attack was a mastermind behind mumbai attack)
हेही वाचा : Dr. Manmohan Singh : चलनी नोटेवर स्वाक्षरी असणारे एकमेव पंतप्रधान, कारण…
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईदने अब्दुल रहमान मक्कीला जमात उद दावाचा उपप्रमुख बनवले होते. मक्कीच्या निधनाची पुष्टी करणारे एक निवेदन जमात उद दावाने जारी केले आहे. मक्की गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती या दहशतवादी संघटनेने दिली आहे. त्याचा मधुमेह वाढल्याने त्यांला उपचारासाठी लाहोरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. जमात-उद-दावाने निवेदनात सांगितले आहे की, मक्कीला शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर त्याच्यावर कारवाई करण्याची भारताकडून सातत्याने मागणी होत होती. त्यानंतरही पाकिस्तान हाफिज सईद आणि त्याच्या समर्थकांना प्रोत्साहन देत आहे. हे लोक पाकिस्तानात फक्त दहशतवादी कारवाया करत नाहीत तर दहशतवादासाठी निधीही गोळा करत आहेत. अनेकदा टाकलेल्या दबावानंतर पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने 2020 मध्ये अब्दुल रहमान मक्कीला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून मक्कीवर ही कारवाई करण्यात आली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, मक्की हा जमात-उद-दावाच्या सर्व निर्णय आणि नियोजन करत होता. त्यामुळे पाकिस्तान मुत्ताहिदा मुस्लिम लीग नावाच्या संघटनेने मक्कीचे वर्णन पाकिस्तानच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते असे केले होते. 2023मध्ये संयुक्त राष्ट्रानेही मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर प्रवास बंदी घालण्यात आली होती तसेच, त्याची मालमत्तादेखील जप्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तरीही, तो इतर दहशतवाद्यांप्रमाणे मोकळेपणे फिरत होता. भारतातील एका संपादकाच्या हत्येसह अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मक्की सहभागी होता. अब्दुल रहमान मक्कीवर 2000 मध्ये लाल किल्ल्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोपही होता. 2018 मध्ये श्रीनगरमधील हल्ला आणि बारामुल्ला दहशतवादी हल्ल्यातही मक्कीचा हात असल्याचे सांगितले जाते. त्याने 30 मे 2018 रोजी बारामुल्ला येथे हल्ला केला होता, ज्यामध्ये तीन नागरिक ठार झाले होते. श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांचीही हत्या करण्यात आली होती. हे हल्ले लष्कर-ए-तैयबाने केले होते आणि मक्की हा त्याचाच भाग होता.